मुख्यमंत्र्यांचे 'ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र' घडवणार 'नवमहाराष्ट्र'..! 

Akshay Kumar Ratan Tata Devendra Fadnavis
Akshay Kumar Ratan Tata Devendra Fadnavis

मुंबई : 'महाराष्ट्र हे देशाचे 'ग्रोथ इंजिन' असून या राज्याने नेहमीच तरुणांना मार्ग दाखविण्याचे काम केले आहे. युवकांमधील शौर्य, ज्ञान, भक्ती-शक्तीच्या जोरावर नव महाराष्ट्र घडविताना महाराष्ट्रातील युवा-युवतींच्या संकल्पनांच्या पंखांना बळ देऊन त्या विकासात परावर्तित करण्याचे काम राज्य शासन करेल', अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे दिली. 

दरम्यान, 'ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र' कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र टीम तयार करण्यात येणार असून हा कार्यक्रम जोपर्यंत महाराष्ट्राचा संपूर्णपणे विकास होत नाही तोपर्यंत सुरुच राहील, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. 

वरळी येथील एनएससीआय येथे आयोजित 'ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र' कार्यक्रमात युवकांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. ते म्हणाले, "कॅप्टन अमोल यादव यांनी स्वदेशी बनावटीचे व्यावसायिक एअरक्राफ्ट (विमान) बनविले आहे. यासाठी व्यावसायिक परवानगी मिळावी, अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली असून ही परवानगी मिळाली तर भारतातले एअरक्राफ्ट आकाशात उडताना दिसेल आणि याचे श्रेय नक्कीच अमोल यादव यांना असेल.'' 

'ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र'च्या निमित्ताने बदलाची आवश्‍यकता आणि बदलासाठी युवाशक्तीचे महत्त्व सांगण्याचा प्रयत्न यानिमित्ताने केला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुमारे सहा लाख युवकांनी सहभाग नोंदविला. 2300 हून अधिक सादरीकरण झाले. त्यातील निवडक 11 कल्पनांचे सादरीकरण या ठिकाणी करण्यात आले. या सादरीकरणातील कार्यक्रमातून नवा महाराष्ट्र घडविण्यात निश्‍चितच योगदान देईल, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. 

जलयुक्त शिवारमुळे परिवर्तन 
'जलयुक्त शिवार अभियानामुळे राज्यातील 11 हजार गावे दुष्काळमुक्त झाली आहेत. ज्या ठिकाणी टॅंकर्सची लक्षणीय संख्या होती तेथे टॅंकरचे प्रमाण झपाट्याने कमी झाले आहे. जलयुक्त शिवार ही एक आता लोकचळवळ झाली आहे', असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

युवकांसाठी 'ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र' हे महत्त्वाचे व्यासपीठ तयार झाले आहे, असे सांगत मुख्यमंत्री म्हणाले की, भारताचा पर्यायाने महाराष्ट्राचा विकास युवाशक्ती करेल असे म्हटले जात होते; पण मी असे म्हणतो, की ही तुमची पिढी आहे जी महाराष्ट्राचा पर्यायाने देशाचा विकास करेल. 'ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र'मुळे युवाशक्तीच्या कल्पना शक्तीला वाव देण्याचा प्रयत्न असून हीच युवाशक्ती परिवर्तन घडवेल. असे ते म्हणाले. 

अंमलबजावणीसाठी स्वतंत्र टीम 
'ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र' या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र टीम तयार करण्यात येणार असून यात मंत्रिगटातील एक, मुख्यमंत्री सचिवालयातील संबंधित अधिकारी आदींचा समावेश असेल. आज निवडण्यात आलेल्या 11 सादरीकरणांचा येत्या सहा महिन्यांत अभ्यास करुन या संकल्पनांची अंमलबजावणीसाठी आराखडा तयार करण्यात येईल, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी उद्योगपती रतन टाटा, सिने अभिनेता अक्षयकुमार, मेजर जनरल अनुज माथूर यांच्यासह सर्व उपस्थितांचे आभार मानले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com