मुख्यमंत्र्यांच्या महापूजेला मागील वर्षी विरोध, यावर्षी सत्कार!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जुलै 2019

'गेल्या वर्षी विठुरायाची पूजा करण्याची संधी मिळाली नाही, पण विठुरायाच्या आशीर्वादामुळेच पुन्हा पंढरपूरात आलो. मराठा समाजाने केलेल्या सत्काराबद्दल मी त्यांचा आभारी आहे.' अशा भावना फडणवीसांनी व्यक्त केल्या.  

पंढरपूर : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या काही मराठा संघटनांनी मागच्या वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूरात विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्यास विरोध केला होता. मराठा समाजाने दिलेल्या इशाऱ्यामुळे व वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ नये म्हणून फडणवीसांनी पंढरपूरला न जाण्याचा निर्णय घेतला होता. त्याऐवजी त्यांनी आपल्या राहत्या घरी म्हणजेचा शासकीय निवासस्थान 'वर्षा' येथे कुटूंपियांसमवेत विठ्ठलाजी पूजा केली होती.

यंदा फडणवीस यांनी पंढरपूरात सपत्निक विठ्ठलाची पूजा केली. सरकारने या वर्षी पासून लागू केलेल्या मराठा आरक्षणामुळे सकल मराठा समाजाने मुख्यमंत्र्यांचे पंढरपूरात स्वागत करून त्यांचा सत्कार केला. 'गेल्या वर्षी विठुरायाची पूजा करण्याची संधी मिळाली नाही, पण विठुरायाच्या आशीर्वादामुळेच पुन्हा पंढरपूरात आलो. मराठा समाजाने केलेल्या सत्काराबद्दल मी त्यांचा आभारी आहे.' अशा भावना फडणवीसांनी व्यक्त केल्या.  

मागील वर्षी मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थिती विठ्ठलाची शासकीय महापूजा वर्षा व अनिल जाधव या दाम्पत्याने केली होती. या वर्षी मुख्यमंत्र्यांसह शासकीय महापूजा करण्याचा मान लातूरच्या विठ्ठल व प्रयागबाई चव्हाण या दाम्पत्याला मिळाला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CM Devendra Fadnavis felicitated by maratha community at Pandharpur