मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 जानेवारी 2019

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरमध्ये आज (गुरुवार) पुन्हा एकदा तांत्रिक बिघाड झाला. उड्डाणापूर्वीच बिघाड उघड झाल्याने पुढील अनुचित घटना टळली. परंतु, या बिघाडामुळे मुख्यमंत्र्यांचा नियोजित सातारा दौऱ्याला काही काळ विलंब झाला आहे.

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरमध्ये आज (गुरुवार) पुन्हा एकदा तांत्रिक बिघाड झाला. उड्डाणापूर्वीच बिघाड उघड झाल्याने पुढील अनुचित घटना टळली. परंतु, या बिघाडामुळे मुख्यमंत्र्यांचा नियोजित सातारा दौऱ्याला काही काळ विलंब झाला आहे.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त त्यांच्या स्मारकाच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री नायगाव (ता. खंडाळा, जि. सातारा) येथे जाणार होते. सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री तिथे पोहोचणार होते. परंतु, दोन तासांनंतरही मुख्यमंत्री न आल्याने, याविषयी चौकशी केली असता, हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरसोबत अनुचित प्रकार होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. दोन वर्षातील ही सहावी घटना आहे. लातूरमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं होते. काही महिन्यांपूर्वी कोल्हापुरात भरकटले होते.

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे पाच तास ताटकळल्या सावित्रीच्या लेकी
सावित्रीबाई फुले यांच्या जयंती कार्यक्रमासाठी अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नायगाव येथे येण्यास दोन तास उशीर झाला. त्यांच्या हेलिकॉप्टर मध्ये बिघाड झाल्याने त्यांना येण्यास उशीर झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे येथील कार्यक्रम राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ आणि विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थित सुरू करण्यात आला. यावेळी पालकमंत्री विजय शिवतारे, सहपालकमंत्री सदाभाऊ खोत, आमदार शंभूराज देसाई, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, दीपक पवार, भाजपचे पदाधिकारी तसेच आयजी विश्वास नांगरे पाटील, पोलिस अधीक्षक पंकज देशमुख तसेच नायगावचे ग्रामस्थ उपस्थित होते.

घटना पुढीलप्रमाणेः
लातूर : 25 मे 2017
लातूरहून मुंबईकडे येण्यासाठी टेक ऑफ घेतल्यानंतर काही क्षणातच कोसळले.

अलिबाग : 7 जुलै 2017
हेलिकॉप्टर लँडिंग मार्कच्या पुढे सरकल्याने मागील पाते मुख्यमंत्र्यांचा डोक्याला लागण्याचा धोका उद्भवला होता.

नाशिक : 9 डिसेंबर 2017
हेलिकॉप्टरने उड्डाण केल्यानंतर क्षमतेपेक्षा अधिक वजन झाल्याने इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.

भाईंदर : 11 जानेवारी 2018
हेलिकॉप्टर मार्गात केबल आल्याने लँडिंग होणाऱ्या हेलिकॉप्टरने पुन्हा टेक ऑफ केले.

सांगली : 24 ऑक्टोबर 2018
हेलिकॉप्टरने उड्डाण घेतल्यानंतर काही वेळात सिग्नल मिळत नसल्याने हेलिकॉप्टर कोल्हापूर शहरावर चकरा मारत होते.

मुंबई : 3 जानेवारी 2019
उड्डाणापूर्वीच हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे उघड. परिणामी त्यांच्या नियोजित सातारा दौऱ्याला विलंब झाला.

Web Title: cm devendra fadnavis helicopter technical issue