शिवसेनेच्या आरोपांना भीक घालत नाही : मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 जानेवारी 2019

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. आपण शिवसेनेच्या आरोपांना भीक घालत नसल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शिवसेनेला फटकारले. योग्य वेळ येताच आपण त्यांना उत्तर देऊ, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला. 
 

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. आपण शिवसेनेच्या आरोपांना भीक घालत नसल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शिवसेनेला फटकारले. योग्य वेळ येताच आपण त्यांना उत्तर देऊ, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला. 

"नगर महापालिकेत आम्ही सर्वाधिक सदस्य निवडून आलेल्या शिवसेनेलाच पाठिंबा देणार होतो. रामदास कदम यांच्याशी तसे बोलणे झाले होते. मात्र, शिवसेनेने पाठिंबा मागितलाच नाही. त्यासाठी विचारणाही केलेली नाही. तीन दिवस आधीपर्यंत माझे सहकारी गिरीश महाजन यांच्याशी सुरू असलेला संपर्क ऐन निवडणुकीवेळी बंद केला. त्यामुळे बिनशर्त पाठिंब्याच्या तयारीत असलेल्या आमच्या पक्षाने महापौर आणि उपमहापौरपदासाठी उमेदवार जाहीर केले आणि ते निवडून आले,' असे ते म्हणाले. भीमा कोरेगाव संबंधात पाच नेत्यांना भाषणाची परवानगी दिली आहे. कायदा व सुव्यवस्था राखणे यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी नंतर एका ठिकाणी पत्रकारांशी बोलताना भावना भडकावत दुही निर्माण करणारी भाषणे होऊ नयेत यासाठी काही जणांना प्रवेश नाकारला, असे "भीम आर्मी'चे नाव न घेता नमूद केले. 

आम्ही कॉंग्रेस तसेच राष्ट्रवादीच्या विरोधात 
आमची भूमिका थेट असून, आम्हाला कॉंग्रेस तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विरोधात लढायचे आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने नगरला आम्हाला पाठिंबा का दिला ते आम्हाला माहिती नाही. हा प्रश्‍न त्यांनाच विचारा, ते उत्तर देतील. तेथे भाजपचे महापौर, उपमहापौर झाले आहेत एवढेच, ही आनंदाची बाब आहे, असे फडणवीस म्हणाले.

Web Title: CM does not give importance to Shiv Sena's allegation