CM Eknath Shinde : विजय बाळासाहेबांच्या विचारांचा; शिवसेनेकडून डोंबिवलीत बॅनरबाजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CM Ekanth shinde won Shiv Sena and symbol bow and arrow balasaheb thackeray Election Commission politics uddhav thackeray

CM Eknath Shinde : विजय बाळासाहेबांच्या विचारांचा; शिवसेनेकडून डोंबिवलीत बॅनरबाजी

डोंबिवली : भारतीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना हे नाव व धनुष्यबाण ही निशाणी बहाल केली आहे. या निकालामुळे ठाकरे गोटात चिंतेचे वातावरण आहे तर शिंदे गटाकडून काल रात्रीच्या जल्लोषानंतर रातोरात शहरात बॅनरबाजी करण्यात आली आहे.

विजय हिंदुत्वाचा...विजय विचारांच्या वारशाचा असे संदेश लिहीत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आशिर्वाद घेताना मुख्यमंत्री शिंदे यांचे फोटो त्यावर झळकवले आहेत. या बॅनरबाजीतून शिंदे गटाची कल्याण डोंबिवली मध्ये असलेली ताकद दाखवली जात असल्याची चर्चा होऊ लागली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी नंतर शिवसेनेत दुफळी निर्माण होऊन ठाकरे व शिंदे गटात शिवसेना विभागली गेली. बहुमताच्या जोरावर शिंदे गटाने शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा केला. याप्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू असून भारतीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटाला शिवसेना हे नाव व धनुष्यबाण हे चिन्ह बहाल केले.

गेले अनेक महिने शिवसेना नेमकी कोणाची ? हा मुद्दा चर्चेत होता. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शिंदे गटात जल्लोषाचे वातावरण पहायला मिळाले. ठाणे मध्ये खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या निर्णयाचे स्वागत जल्लोष साजरा करत केले. तर खासदार शिंदे यांचा मतदार संघ असलेल्या कल्याण लोकसभा मतदार संघात देखील त्यांच्या कार्यकर्त्यांनी या निर्णयाचे जल्लोषात स्वागत केले.

जल्लोषात स्वागत करण्यात आल्यानंतर रातोरात शहरात कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करत शक्ती प्रदर्शन केल्याचे पहायला मिळत आहे. या बॅनर वरील फोटो आणि त्याबाजूला लिहिलेले संदेश साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. मुख्यमंत्री शिंदे हे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा आशिर्वाद घेताना तसेच हातात धनुष्यबाण घेतलेले शिंदे असे फोटो या बॅनर वर झलकविण्यात आले आहेत.

निवडणूक आयोगाच्या निकालानंतर मुख्यमंत्री शिंदे हे बाळासाहेबांचा आशिर्वाद घेत असतानाचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शिंदे गटातील असंख्य शिवसैनिकांनी हा फोटो आपल्या सोशल अकाउंट वर देखील व्हायरल केल्याचे पहायला मिळत आहे.

बॅनर्स वर काय आहेत संदेश

  • सत्याचा विजय...

  • 'सत्याचा विजय ' होय सत्याचाच विजय... भारतीय निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या आणि पर्यायाने

  • हिंदुहृदयसम्राट वंदनीय स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या खऱ्या वारसदाराला अर्थात माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना शिवसेनेचा आणि निशाणी धनुष्यबाण याचा उत्तराधिकारी म्हणून शिक्कामोर्तब केलं.

  • ॥ अनाथांचा नाथ एकनाथ ॥ शिवसेना जिंदाबाद... कोण आला रे कोण आला.... शिवसेनेचा वाघ आला....

  • आवाज कोणाचा शिवसेनेचा...

  • विजय हिंदुत्वाचा... विजय विचारांच्या वारशाचा...