
Eknath Shinde : भूषण देसाईंच्या शिवसेना प्रवेशानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, येत्या काळात...
मुंबईः उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे विश्वासू आणि एकनिष्ठ असेलेले सुभाष देसाईंचे पुत्र भूषण देसाई यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे यांना हा मोठा धक्का समजला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीतमध्ये मुंबईत हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला.
यानंतर बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, भूषण देसाई यांनी काम करणाऱ्या लोकांसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचं मी शिवसेनेमध्ये स्वागत करतो. राज्यामध्ये स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचं सरकार स्थापन झालं आहे. त्यांची भूमिका आणि विचार पुढे नेण्याचं काम आम्ही करत आहोत.
शिंदे पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील हजारो पदाधिकारी आणि शेकडो स्थानिक स्वराज्य संस्थेतील सदस्य शिवसेनेमध्ये येत आहेत. आम्हीही सर्वसामान्यांसाठी काम करत आहोत. सध्या मुंबईच्या विकासासाठी काम करत असून येत्या सहा-सात महिन्यामध्ये मुंबईचं रुपडं पालटणार आहे. आरोग्यदायी मुंबई, कोळीवाड्यांचा विकास आणि रस्त्यांचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले.
भूषण देसाई यांच्या प्रवेशानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. शिवसेनेच्या अनेक निष्ठावंत नेत्याच्या घरात फूट पडली आहे, गजानन किर्तीकर यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला मात्र त्यांचा मुलगा उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिला, यानंतर आता देसाई यांच्या घरात फूट पडली आहे. शिंदे गटाला मिळणारा पाठिंबा दिवसेंदिवस वाढत आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या अडचणी वाढताना दिसत आहे.
सुभाष देसाई ठाकरेंचे निष्ठावान...
सुभाष देसाई हे शिवसेनेच्या ज्येष्ठ आणि निष्ठावान नेत्यांपैकी एक आहेत. गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे ते सध्या प्रतिनिधित्त्व करत आहेत. 1990 मध्ये पहिल्यांदा सुभाष देसाई हे विधानसभा निवडणुकीत विजयी झाले. त्यानंतर 2004, 2009 मध्ये सलग दोनवेळा निवडणुकीत विजयी झाले. 2009 ते 2014 या दरम्यान शिवसेनेचे विधिमंडळनेते म्हणून त्यांची निवड करण्यात आली. त्यानंतर 2005 मध्ये शिवसेनेच्या नेतेपदी निवड झाली.