मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्राची दिशाभूल- राणे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016

पेण ः "अच्छे दिन'ची खोटी आकडेवारी देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राची दिशाभूल करत आहेत, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी येथे केली.

पेण ः "अच्छे दिन'ची खोटी आकडेवारी देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राची दिशाभूल करत आहेत, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी येथे केली.
येथील नगरपालिकेतील कॉंग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ शनिवारी झालेल्या सभेत नारायण राणे बोलत होते. केंद्रात भाजप सरकार येऊन अडीच, तर महाराष्ट्रात दोन वर्षे झाली. मी दररोज "अच्छे दिन' येण्याची वाट पाहतोय; पण ते कुठे दिसतच नाहीत, असा टोला लगावत राणे यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला. महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. त्याबद्दल सरकार काहीही बोलत नाही. मुख्यमंत्री "डिजिटल इंडिया'चे स्वप्न दाखवत आहेत; मात्र दोन वर्षांत एकाही ग्रामपंचायतीला साधा संगणकही दिलेला नाही. आठ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या गप्पा मारणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र गुन्हेगारीत पहिल्या क्रमांकावर पोचवला, तर उद्योगधंद्यात दहाव्या क्रमांकावर नेऊन ठेवण्याची किमया केल्याचा आरोप राणे यांनी या वेळी केला.

नोटाबंदीवरून देशात अस्वस्थता
पाचशे आणि हजाराच्या नोटा बंद करून देशात अस्वस्थता निर्माण करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. पैसे काढण्याच्या रांगेत उभे राहून आतापर्यंत पन्नासपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. सर्वसामान्यांना प्यायला पाणी नाही, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई नाही, त्या देशाचे पंतप्रधान लाखाचा कोट घालतात. ते गरिबांचे प्रतिनिधी कसे होऊ शकतात, असा प्रश्‍न नारायण राणे यांनी या वेळी उपस्थित केला.

Web Title: cm fadnavis deceiving maharashtra- rane