मुख्यमंत्र्यांचा कौल अखेर पक्षनिष्ठेलाच !

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 डिसेंबर 2016

औरंगाबाद : धनशक्ती विरुद्ध पक्षनिष्ठेच्या स्पर्धेत अखेर पक्षनिष्ठा जिंकली. ज्येष्ठ नगरसेवक भगवान ऊर्फ बापू घडामोडे यांच्या नावावर औरंगाबादच्या महापौरपदासाठी मुख्यमंत्र्यांनी शिक्कामोर्तब केले. महिनाभरापासून कोण होणार महापौर हा प्रश्‍न मुख्यमंत्र्यांनी नागपुरातूनच निकाली काढला. जातीचे समीकरण, धनशक्ती, गॉडफादर, शिफारस याचा विचार न करता केवळ पक्षनिष्ठा या निकषावर घडामोडे यांची महापौरपदासाठी निवड केल्याने निष्ठावान कार्यकर्त्यांच्या जिवात जीव आला आहे. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी त्यांचे कट्टर समर्थक राजू शिंदे याच्या उमेदवारीसाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती.

औरंगाबाद : धनशक्ती विरुद्ध पक्षनिष्ठेच्या स्पर्धेत अखेर पक्षनिष्ठा जिंकली. ज्येष्ठ नगरसेवक भगवान ऊर्फ बापू घडामोडे यांच्या नावावर औरंगाबादच्या महापौरपदासाठी मुख्यमंत्र्यांनी शिक्कामोर्तब केले. महिनाभरापासून कोण होणार महापौर हा प्रश्‍न मुख्यमंत्र्यांनी नागपुरातूनच निकाली काढला. जातीचे समीकरण, धनशक्ती, गॉडफादर, शिफारस याचा विचार न करता केवळ पक्षनिष्ठा या निकषावर घडामोडे यांची महापौरपदासाठी निवड केल्याने निष्ठावान कार्यकर्त्यांच्या जिवात जीव आला आहे. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी त्यांचे कट्टर समर्थक राजू शिंदे याच्या उमेदवारीसाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मराठा जातीचे कार्ड वापरत मराठा उमेदवार देण्याचा हट्ट धरला होता. यावर बापू घडामोडेंच्या नावाला पसंती दर्शवत मुख्यमंत्र्यांनी बागडेंना व दानवे यांनाही चकवा दिला.

औरंगाबाद महापालिकेत शिवसेनेच्या महापौरपदाचा कालावधी संपल्यानंतर त्र्यंबक तुपे यांनी 30 नोव्हेंबर रोजी राजीनामा दिला होता. तत्पूर्वी सेना-भाजपमध्ये राजीनामा नाट्यावरुन बराच कलगीतुरा रंगला होता. अखेर मुख्यमंत्र्यांची शिष्टाई कामी आली आणि शेवट गोड झाला. भाजपच्या वाट्याला 11 महिन्याच्या कालावधीसाठी महापौरपद मिळाले आहे. यासाठी महिनाभरापासून इच्छुकांनी त्यांच्या गॉडफादर नेत्यांचे उंबरठे झिजवणे सुरू केले होते. अगदी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या खासगी दौऱ्यात देखील लॉबिंगचे प्रयत्न झाले. कॉंग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेल्या प्रमोद राठोड यांना भाजपकडून उपमहापौरपद बहाल करण्यात आले तेव्हापासूनच भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली होती.

महापौरपदासाठी यावेळी तरी निष्ठावंताचा विचार होणार का? अशी चर्चा होती. बापू घडामोडे, राजू शिंदे, विजय औताडे, माधुरी अदंवत यांच्यासह डझनभर नावे पुढे आली असतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या चतुराईने पक्षनिष्ठेला झुकते माप देत बापू घडामोडे यांना संधी दिली. यामुळे पक्षात एक सकारात्मक संदेश तर गेलाच पण बागडे, दानवे यांच्या सारख्या पक्षातील ज्येष्ठांना देखील या गोष्टीची जाणीव करून देण्यात आली. बापू घडामोडेंच्या उमेदवारीने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मुख्यमंत्र्यांनी न्याय केल्याची भावना निर्माण झाली आहे एवढे मात्र निश्‍चित. भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवानी यांनी संधिसाधू राजकारण करण्याचा प्रयत्न करत आपल्या भावाचे नाव ऐनवेळी चर्चेत आणले. त्याला पक्षाकडून फारशी किंमत देण्यात आली नाही. पैशाने सर्व काही शक्‍य होते हा राजू शिंदे यांचा समज देखील या निमित्ताने दूर झाला.

Web Title: cm fadnavis for loyalty to bjp