... तर दुसरीच्या गणितात बदल करू

उमेश शेळके/सुशांत सांगवे
गुरुवार, 20 जून 2019

दुसरीचा अभ्यासक्रम यंदा बदलला असून ‘बालभारती’ची नवी पाठ्यपुस्तके बाजारात दाखल झाली आहेत.

मुंबई/लातूर : दुसरीच्या गणितातील संख्यावाचनात केलेला बदल ‘सकाळ’ने सर्वप्रथम वाचकांसमोर मांडला. त्यानंतर या बदलावर साहित्यिकांनी नाराजी दर्शवत टीकेचा सूर आळवला. याचे पडसाद विधीमंडळाच्या अधिवेशनातसुद्धा उमटले. विरोधकांनी केलेल्या टिकेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणितात केलेल्या बदलांचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमली जाईल. त्यानंतर आवश्यकता भासली, तर गणितात बदल करू, असे आश्वासन देत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

दुसरीचा अभ्यासक्रम यंदा बदलला असून ‘बालभारती’ची नवी पाठ्यपुस्तके बाजारात दाखल झाली आहेत. दुसरीच्या गणितात संख्यावाचनात केलेल्या बदलांवर आधारित ‘त्र्याहत्तर ऐवजी सत्तर तीन’ असे वृत्त ‘सकाळ’च्या १४ जूनच्या अंकात प्रसिद्ध झाले. त्यानंतर या बदलांवर साहित्यिकांनी नाराजी दर्शवली. ही मराठी भाषेची मोडतोड आहे, यामागे इंग्रजी लॉबीचे कटकरस्थान आहे, अशा शब्दांत टीकाही करण्यात आली. तर दुसरीकडे, काही शिक्षणतज्ज्ञांनी हे बदल स्वागतार्ह असल्याचे सांगितले. त्यामुळे या विषयावर राज्यात वैचारिक चर्चा रंगली.

या विषयाचे पडसाद विधीमंडळ अधिवेशनातही उमटले. संख्यावाचनाच्या नव्या पद्धतीस काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार विरोध दर्शवला. सरकारचे डोके ठिकाणार आहे का? असा सवाल उपस्थित करून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने शिकवायचे सोडून त्यांच्यावर प्रयोग केले जात आहेत. त्यांचे नुकसान केले जात आहे. त्यामुळे ही नवीन पद्धत मागे घ्यावी, अशी मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही या बदलाला विरोध दर्शवला. शिक्षण, साहित्य क्षेत्रातून होणारा विरोध लक्षात घेऊन सरकार हे नवे मागे घ्यावेत, असे सांगितले. काँग्रेसचे विधानसभेतील गटनेते विजय वडेट्टीवार, शिक्षक आमदार कपील पाटील यांनीही कडाडून विरोध केला.

यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘दुसरीचा अभ्यासक्रम एससीआरटीने ठरवला आहे. दुसरीच्या मुलांना अधिक सोप्या पद्धतीने कसे शिकवता येईल, याचा अभ्यास करून हे बदल तज्ज्ञांच्या समितीने केले आहेत. सभागृहाचे मत लक्षात घेऊन अधिक तज्ज्ञांची समिती नेमली जाईल. ती या बदलांचा अभ्यास करेल. त्यांच्या निकषानुसार आवश्यकता असेल, तर दुसरीच्या गणितात बदल करू. पुढची पिढी हसत-खेळत, चांगल्या वातावरण शिकावी, असेच आम्हाला वाटते.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CM Fadnavis promised for change in mathematics teaching method if expert committee agree on it