देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन करताना उद्धव ठाकरेंची जोरदार 'बॅटिंग'

टीम ई-सकाळ
रविवार, 1 डिसेंबर 2019

आयुष्य एक रंगभूमी आहे. कधी कोणाला काय रोल करावा लागेल हे सांगता येत नाही. - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : विधानसभेच्या विरोधीपक्ष नेते पदी आज, देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली. सभागृहात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हस्तांदोलन करून, त्यांचे अभिनंदन केले. फडणवीस विरोधीपक्ष नेत्याच्या स्थानावर विराजमान झाले. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यात त्यांनी जोरदार बॅटिंग करत, फडणवीस यांना चिमटेही काढले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

आणखी बातमी - विरोधीपक्ष राहणार नाही म्हणणारे फडवणीस विरोधीपक्ष नेते

काय म्हणाले उद्धव ठाकरे?
उद्धव ठाकरे म्हणाले, 'विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आपलं अभिनंदन करण्यासाठी उभा आहे. तुमचा परिचय आज माझ्या हातात आला. आधी आला असता तर, बरं झालं असतं. अनेक वर्षे मैत्री असलेले विरोधात बसलेत आणि विरोधात असलेले माझ्या सोबत बसले आहेत. विरोधी पक्षनेता माझा जवळचा मित्र आहे. आपल्यात अंतर ठेवायला नको. आयुष्य एक रंगभूमी आहे. कधी कोणाला काय रोल करावा लागेल हे सांगता येत नाही. मी इथे पुन्हा कधी येईल, असं बोललो नव्हतो. पण, माझं भाग्य होतं म्हणून मी इथे पुन्हा आलो. त्यावेळी ही हिंदुत्व होतं आणि आजही आहे. पण, दिलेला शब्द पाळणं हे माझं हिंदुत्व आहे. मी पाच वर्षांत कधी ही सरकारला धोका दिला नाही. मला काळोखात काही करायचं नाही. मला शेतकऱ्याला कर्ज मुक्तच नाही करायचं तर, चिंता मुक्त करायचं आहे. देवेंद्र फडणवीस तुम्ही आजही माझे मित्र आहात. तुम्ही जर, माझ्या सोबत असता तर, मी घरी बसून टीव्हीवर हा कार्यक्रम बघत बसलो असतो.'

आणखी वाचा - मी सांगतोय तेवढचं ऐकायचं; नाना पटोलेंचं सभागृहात पहिलं वक्तव्य

काय घडले नाट्य?
सत्ताधारी महाविकास आघाडीच्या आवाहनानंतर भाजपनं विधानसभा अध्यक्षपदासाठीचे उमदेवार किसन कथोरे यांचं नाव मागे घेतलं. त्यामुळं विधानसभा अध्यक्षपदी नाना पटोले यांची बिनविरोध निवड झाली. सकाळी दहा वाजता हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी चर्चेसाठी बोलवल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्यांनी त्यांची भेट घेतली. भाजपन विधानसभा निवडणुकीत माघार घेतल्यानंतर, आजच्या कामकाजात विरोधीपक्षनेते पद निवडीचा समावेश करण्यात आला. काल जाहीर झालेल्या कामकाजात ही निवड प्रक्रिया नव्हती. त्यामुळं महाविकास आघाडी फडवणीस यांची कोंडी करणार आणि हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेता निवडला जाईल, अशी शक्यता होती. पण, ही निवड आजच झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cm uddhav thackeray congratulates devendra fadnavis for being opposition leader