कोस्टल रोडची घोषणा भाजपच्या अंगलट 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

मुंबई - भारतीय जनता पक्षासाठी मुंबई महापालिकेतला "ड्रीम प्रोजेक्‍ट' असलेल्या कोस्टल रोडला काही परवाने शिल्लक असल्याने जाहीरनाम्यातून वगळावे लागल्याचे समोर आले आहे. यामुळे सर्व परवानग्या मिळाल्याचा भाजप नेत्यांचा दावा फोल ठरला असून, विरोधी पक्षाने यावर टीका करण्यास सुरवात केली. 

मुंबई - भारतीय जनता पक्षासाठी मुंबई महापालिकेतला "ड्रीम प्रोजेक्‍ट' असलेल्या कोस्टल रोडला काही परवाने शिल्लक असल्याने जाहीरनाम्यातून वगळावे लागल्याचे समोर आले आहे. यामुळे सर्व परवानग्या मिळाल्याचा भाजप नेत्यांचा दावा फोल ठरला असून, विरोधी पक्षाने यावर टीका करण्यास सुरवात केली. 

बोरिवली ते चर्चगेट सुसाट-पंधरा मिनिटांत, अशी घोषणा करत मुंबईकरांना भुरळ घालण्याचा प्रयत्न केला होता; मात्र हा प्रकल्पच जाहीरनाम्यात समाविष्ट नसल्याने विरोधकांनाही आश्‍चर्याचा धक्का बसला होता. आता या प्रकल्पाच्या उभारणीसाठी भाजप सरकार कटिबद्ध असून, राहिलेले एक दोन परवाने मिळाल्यावर प्रत्यक्ष प्रकल्पाच्या उभारणीची प्रक्रिया सुरू होईल, असा दावा भाजपच्या जाहीरनामा समितीचे प्रमुख भालचंद्र शिरसाट यांनी केला आहे; मात्र शिवसेनेसोबत कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसला कोस्टल रेडचा मुद्दा आयताच मिळालेला असून, भाजपवर टीकेची झोड सुरू केली आहे. विरोध पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत बोलताना भाजप हा फक्त घोषणाबाजी करणारा पक्ष असून, थापा मारून मते मिळवण्याचा प्रयत्न करणारा हा पक्ष आहे. जे झाले नाही ते रेटून खोटं बोलून सांगण्यात भाजप पटाईत असल्याची टीका त्यांनी केली. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजप हा गोबेल्सच्या नीतीनं चालणारा पक्ष आहे. गल्ली ते दिल्लीपर्यंत खोटं रेटून सांगून जनतेची दिशाभूल करण्यात भाजप पटाईत आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोस्टल रोडला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने सर्व आवश्‍यक परवाने दिल्याची घोषणा केली होती. असे असताना मुंबईकरांच्या जिव्हाळ्याच्या असलेल्या या प्रकल्पाचा भाजप जाहीरनाम्यात उल्लेख नसल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

Web Title: Coastal Road, BJP announced recoil