सर्दी, ताप, खोकला वाढला! सोलापूरसह १० जिल्ह्यात कोरोना रुग्ण; मास्क वापरा,‌ गर्दीत जाऊ नका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona
सर्दी, ताप, खोकला वाढला! सोलापूरसह १० जिल्ह्यात कोरोना रुग्ण; मास्क वापरा,‌ गर्दीत जाऊ नका

सर्दी, ताप, खोकला वाढला! सोलापूरसह १० जिल्ह्यात कोरोना रुग्ण; मास्क वापरा,‌ गर्दीत जाऊ नका

सोलापूर : दोन-अडीच महिने हद्दपार झालेला कोरोना पुन्हा एकदा वाढण्याच्या तयारीत असल्याची स्थिती आहे. सध्या सोलापूर शहरात १७ तर ग्रामीणमध्ये चार सक्रिय रुग्ण आहेत. सध्या मुंबई, ठाणे, पुणे, वाशिम व धाराशिव जिल्ह्यामध्ये अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण जास्त आहेत. दुसरीकडे मुंबई (१११), ठाणे (७४), पुणे (१८५) या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असून रायगड, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, धाराशिव व अमरावती या जिल्ह्यांमध्ये दहापेक्षा अधिक रुग्ण सक्रिय आहेत. पण, समाधानकारक बाब म्हणजे, त्यांच्यात तीव्र किंवा माध्यम स्वरूपाची लक्षणे नसल्याने ते वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने त्यांच्या स्वत:च्या घरी उपचार घेत आहेत.

कोणत्याही रुग्णांना श्वास घ्यायला त्रास होत असल्यास किंवा दोन दिवसांपेक्षा अधिक दिवस १०० पेक्षा अधिक ताप असल्यास वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने कोरोना टेस्ट करून वेळेत उपचार घ्यायला हवेत. दरम्यान, आतापर्यंत सोलापूर शहरात ३४ हजार ५६१ व्यक्तींना कोरोना होऊन गेला आहे. सद्य:स्थितीत शहरातील नऊ पुरुष व आठ महिला कोरोना बाधित असून ते होम आयसोलेशनमध्ये आहेत. दुसरीकडे, सोलापूर ग्रामीणमधील एक लाख ८७ हजार ४१२ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली होती. सध्या माढा, मोहोळ, उत्तर सोलापूर व पंढरपूर तालुक्यात प्रत्येकी एक सक्रिय रुग्ण आहे. त्यात एक पुरुष व तीन महिला आहेत.

पावणेदोन लाख व्यक्तींनी लस घेतलीच नाही

जिल्ह्यातील १२ वर्षांवरील ३४ लाख ४१ हजार ४०० व्यक्तींनी कोरोनावरील प्रतिबंधित लस टोचून घेणे आवश्यक आहे. पण, आतापर्यंत जिल्ह्यातील पावणेदोन लाख व्यक्तींनी लसीचा एकही डोस घेतलेला नाही. दुसरीकडे, पहिला डोस घेतलेल्या तब्बल सात लाख व्यक्तींनी दुसरा डोस घेतलाच नाही. तर जिल्ह्यातील अवघ्या एक लाख ८७ हजार व्यक्तींनीच संरक्षित डोस (बूस्टर) घेतला आहे. वातावरणातील बदलांमुळे सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण वाढत असल्याने नागरिकांनी प्रतिबंधित लस टोचून घ्यावी, असे आवाहन केले जात आहे.

गर्दीत जावू नये, मास्कचा वापर हवा

सध्या सोलापूर शहरात सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण आढळत आहेत. प्रत्येकाने विशेषत: ज्येष्ठ नागरिकांनी गर्दीत जाणे टाळावे. लक्षणे वाटल्यास त्यांनी त्वरित कोरोनाची टेस्ट करून घ्यावी. प्रतिबंधित लस टोचून घ्यावी आणि चेहऱ्यावर मास्क घालायला हवा.

- डॉ. बसवराज लोहारे, आरोग्याधिकारी, सोलापूर महापालिका

टॅग्स :Nashiksolapur city