परीक्षा द्यायची की खड्डे खोदायचे?

मनोज भिवगडे
बुधवार, 22 मे 2019

खड्ड्यांसाठी आताच आग्रह का?
विद्यापीठाच्या परीक्षा सुरू असताना आणि वृक्ष लागवड जून-जुलैमध्ये होणार असताना कडक उन्हातच खड्डे खोदण्याचा आग्रह का, असा प्रश्‍न विद्यार्थी व शिक्षकांमधून उपस्थित होत आहे. उन्हाचा पारा कमी झाल्यानंतरही विद्यार्थ्यांकडून खड्डे खोदण्याचे काम करून घेतले जाऊ शकते. त्यातून अपेक्षित उद्देशही साध्य होईल, असे शिक्षकांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

अकोला - सरकारच्या ३३ कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्यांक गाठण्यासाठी चक्क परीक्षा काळात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाच खड्डे खोदण्यासाठी जुंपले जात असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांचा खड्डे खोदण्याच्या कार्यक्रमात सामाजिक दायित्वाच्या नावाखाली सहभागी करून घेण्याचा व त्याचा अहवाल २५ मेपर्यंत पाठविण्याचा लेखी आदेश विद्यापीठाने सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांना दिला आहे.

लोकसभा निवडणुकीमुळे आधीच विलंबाने सुरू झालेल्या परीक्षांमुळे विद्यार्थी त्रस्त आहेत. एप्रिल-मे हा काळा विद्यापीठाच्या परीक्षेचा. या काळात सर्वच अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा असतात. प्राध्यापक व शिक्षकांना या काळात परीक्षा घेणे व उत्तरपत्रिका तपासणीचे काम असते.

या काळातच आणि एप्रिल-मेच्या कडक उन्हात महाविद्यालयीन शिक्षक व विद्यार्थ्यांना वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदण्यासाठी जुंपले जात आहे. यापूर्वी विद्यापीठाने महाविद्यालयांना खड्डे खोदण्यासाठी एप्रिलपर्यंतची मुदत दिली होती. 

परीक्षा सुरू असल्याने खड्डे खोदण्याच्या कामात अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचे ३० एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या आढावा सभेत दिसून आले. त्यामुळे दिलेले लक्ष्यांक पूर्ण करून त्या संदर्भातील अहवाल व छायाचित्रे २५ मेपर्यंत सादर करण्याचा आदेश विद्यापीठाने सर्व महाविद्यालयाच्या 
प्राचार्यांना दिला आहे.

सामाजिक दायित्वाला फाटा!
सामाजिक दायित्व म्हणून सर्व महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थ्यांना सरकारने खड्डे खोदण्याचे काम दिले आहे. मात्र, परीक्षा काळात हे काम दिल्यामुळे आदेशाचे पालन करण्यासाठी मजूर लावून ही कामे करून घेतली जातील. त्यासाठी शिक्षकांनाच खर्च करावा लागेल. त्यातून सामाजिक दायित्वाचे भान बाजूला राहून केवळ आदेशाची खानापूर्ती एवढाच उद्देश साध्य होणार आहे.

Web Title: College Student Exam Tree Plantation Hole Government