राज्यभरातील महाविद्यालयांनी शुल्ककपातीला लावला ठेंगा

Education
Education

पुणे - ‘कोरोना’च्या काळात पालकांची आर्थिक स्थिती नाजूक झाल्याने व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या संस्थांनी शुल्ककपात करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, असे आवाहन शुल्क प्राधिकरण समितीने (फी रेग्युलेशन ॲथॉरिटी-एफआरए) केले होते. मात्र राज्यभरातील महाविद्यालयांनी या आवाहनाला ठेंगा दाखवला आहे. राज्यभरात केवळ वाशीतील एका महाविद्यालयाने ५ हजार रुपये शुल्क कमी केले आहे.

‘सीईटी सेल’तर्फे सध्या अभियांत्रिकी, एमबीए, आर्किटेक्‍चर, फार्मसी, एमसीए, हॉटेल मॅनेजमेंट यांसह इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या पदवी व पदव्युत्तर पदवीची प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. महाविद्यालये जानेवारी महिन्यात प्रवेशाची पहिली फेरी संपली की सुरू होण्याची शक्‍यता आहे. ‘कोरोना’मुळे शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक कोलमडून गेले आहे. त्यामुळे यंदाच्या २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील सहा महिन्यांचा कालावधी वाया गेला आहे. जानेवारी महिन्यात प्रथम वर्षाचे वर्ग सुरू झाले तरी ते पूर्ण क्षमतेने प्रत्यक्षात महाविद्यालये कधी सुरू होतील, हे सांगता येत नाही. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पालकांची आर्थिक स्थिती चांगली नाही. येत्या वर्षात विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील ग्रंथालय, कॉम्प्युटर लॅब, प्रयोगशाळा, क्रीडांगणे अशा सुविधा वापरता येणार नाहीत. त्यामुळे विकास शुल्कासह यामध्ये कपात करावी, असे आवाहन ‘एफआरए’ने व्यावसायिक शिक्षण संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन केले होते. तसेच विद्यापीठांना पत्र पाठवून याबाबत संलग्न महाविद्यालयांना सूचना द्याव्यात, असेही सांगितले होते. परंतु यास कोणताही प्रतिसाद मिळालेला नसल्याने गतवर्षी जेवढे शुल्क होते, तेवढे विद्यार्थ्यांना भरावे लागणार आहे.

व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या संस्थांचे डेव्हलपमेंट शुल्कासह ग्रंथालय, क्रीडा याचे शुल्क कमी होऊ शकते. तसेच, या संस्थांमधील प्राध्यापकांची दरवर्षी वेतनवाढ होतेच असे नाही. त्यामुळे शुल्ककपात करावी, असे आवाहन बैठकीत केले होते. यास संस्थांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. वाशीतील एका महाविद्यालयाचे ९० हजार शुल्क आहे, त्यांनी ५ हजार रुपये कमी केले आहेत. इतर काही महाविद्यालयांनी तयारी दर्शविली आहे; पण ही कपात खूप कमी आहे.
- डॉ. आर. एस. माळी, सदस्य, ‘एफआरए’ 

गेल्या वर्षी केलेल्या खर्चाच्या आधारे यंदाचे शुल्क निश्‍चित झाले आहे, त्यामुळे शुल्ककपात करणे शक्‍य नाही. कपात केली तर त्याचा परिणाम शिक्षकांच्या नोकऱ्यांवर होईल. यंदाचा संस्थांचा खर्च कमी झाल्यास त्याचा फायदा २०२२-२३ चे शैक्षणिक वर्षाचे शुल्क निश्‍चित होताना विद्यार्थ्यांना मिळेल.
- डॉ. एकनाथ खेडकर, अध्यक्ष, असोसिएशन ऑफ मॅनेजमेंट ऑफ एमबीए इन्स्टिट्यूट

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com