आयोग व समित्यांवर निष्ठावंतांची बोळवण

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 28 एप्रिल 2018

मुंबई - भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मुंडेसमर्थक पाशा पटेल यांची राज्य कृषीमूल्य आयोगावर नेमणूक केल्यानंतर प्रदेश प्रवक्‍ते माधव भांडारी यांची नियुक्‍ती राज्य पुनर्वसन प्राधिकरण तथा राज्य पुनर्वसन व पुनर्स्थापना संनियंत्रण समितीच्या उपाध्यक्षपदावर करण्यात आली.

भाजपने राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर गेल्या साडेतीन वर्षांत अन्य पक्षांतून आलेल्या नेत्यांचे पुनर्वसन केले आहे. यामध्ये महादेव जानकर, सदाभाऊ खोत, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना विधान परिषदेतील आमदारकी देण्यात आली. या वेळी माधव भांडारी, पाशा पटेल यांच्यासह अनेक भाजप नेते इच्छुक असताना त्यांना डावलण्यात आल्याने पक्षात नाराजीचा सूर होता. पाशा पटेल शेतकरी नेते असून, गेल्या 40 वर्षांपासून ते शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर लढा देत आहेत. त्यांची नंतर राज्य कृषीमूल्य आयोगाच्या अध्यक्षपदावर वर्णी लावण्यात आली.

माधव भांडारी अनेक वर्षांपासून प्रवक्‍ते म्हणून पक्षाची भूमिका प्रभावीपणे मांडत आहेत. त्यामुळे ज्यावेळी विधान परिषदेतील जागा भरण्याची वेळ आली तेव्हा भांडारी यांचे नाव सर्वांत पुढे असायचे. आता भांडारी यांची राज्य पुनर्वसन प्राधिकरण तथा राज्य पुनर्वसन व पुनर्स्थापना संनियंत्रण समितीच्या उपाध्यक्षपदावर नियुक्‍ती करण्यात आली आहे. पाशा पटेल यांच्यासह भांडारी यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे.

भांडारी यांना देय भत्ते (रुपयांत)
500 - समितीच्या प्रतिबैठकासाठी
3,000 - प्रतिमाह दूरध्वनी खर्च
72,000 - इंधनाचा वार्षिक खर्च

Web Title: commission and committee selection pasha patel madhav bhandari