सामान्यांच्या मनातल्या विश्‍वासाचा विजय - फडणवीस

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 12 मार्च 2017

मुंबई - उत्तर प्रदेशसह विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेले घवघवीत आणि ऐतिहासिक यश हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांच्या मनात निर्माण केलेल्या विश्‍वासाचे प्रतीक आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली.

मुंबई - उत्तर प्रदेशसह विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेले घवघवीत आणि ऐतिहासिक यश हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांच्या मनात निर्माण केलेल्या विश्‍वासाचे प्रतीक आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली.

पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली झालेले निवडणुकीचे नियोजन आणि संघटनात्मक रचना यामुळे जनतेने भाजपला भरभरून साथ दिली. केंद्रातील सरकारने विविध योजनांच्या माध्यमातून जो गरीब कल्याण कार्यक्रम हाती घेतला, त्याला जनतेनेही साथ दिली. या विजयाने हे विकासाचे युग आणखी पुढे जाईल. आज एक नवा इतिहास रचला गेला आहे. ज्यांना बॅंकेच्या रांगेत उभे राहावे लागले नाही; पण तरीही त्यांनी चलनबंदीला विरोध केला, त्यांना जनतेने आपला निर्णय आज सांगितला. भाजपचा एक कार्यकर्ता म्हणून मी सर्वांचे आभार मानतो आणि अभिनंदनही करतो, असे फडणवीस म्हणाले.

उत्तर प्रदेश हा एकप्रकारे लहान भारतच आहे. आज त्याचा "मूड' देशाने पाहिला. पारदर्शी मार्गावर वाटचाल करत असताना विकासाचे एक नवीन पर्व आज सुरू झाले, असेही ते म्हणाले. एका प्रश्‍नाच्या उत्तरात ते म्हणाले, की कॉंग्रेस हा संघटित पक्ष नाही. घराणेशाहीचे नेतृत्व मान्य करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय दिसत नाही. ते मान्य केले नाही, तर पक्षाचे तुकडे होतात, अशी त्यांची अवस्था आहे.

"मुदतपूर्व'ची शक्‍यता नाही
राज्यात कर्जमाफीवरून सत्ताधारी शिवसेनेने कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत विधिमंडळाचे अधिवेशन रोखून धरलेले असताना एकाकी पडलेल्या भाजपला आजच्या निकालांनी हत्तीचे बळ दिले आहे. देशाचा रागरंग काय आहे हे लक्षात घ्या, असे सूचक विधान करत फडणवीस यांनी राज्यात मुदतपूर्व निवडणुकांची शक्‍यता नसल्याचे स्पष्ट केले.

Web Title: The common faith of the heart beat