मुख्यमंत्री, आमीर खानच्या विरोधात तक्रार

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

मुंबई - मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेता आमीर खान आणि "मुंबई फर्स्ट' या स्वयंसेवी संस्थेविरोधात मंगळवारी निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल केली. शिवसेनेच्या वतीने ऍड. धर्मेंद्र मिश्रा यांनी ही तक्रार दाखल केली असून, ते युवा सेनेचे पदाधिकारी आहेत.

मुंबई - मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेता आमीर खान आणि "मुंबई फर्स्ट' या स्वयंसेवी संस्थेविरोधात मंगळवारी निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल केली. शिवसेनेच्या वतीने ऍड. धर्मेंद्र मिश्रा यांनी ही तक्रार दाखल केली असून, ते युवा सेनेचे पदाधिकारी आहेत.

राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचा प्रचार संपल्यावर कोणत्याही वर्तमानपत्रात किंवा खासगी वृत्तवाहिन्यावर जाहिराती करण्यास राज्य निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना मज्जाव केला होता. आयोगाच्या निर्णयानुसार 19 फेब्रुवारीपासूनच प्रसारमाध्यमांवरील प्रचाराच्या जाहिराती बंद झाल्या होत्या. मुंबईतील एका दैनिकात "मुंबई फर्स्ट'च्या माध्यमातून देण्यात आलेल्या जाहिरातींवर कॉंग्रेससह शिवसेनेने आक्षेप घेतला. प्रचाराची वेळ संपल्यानंतर आज वृत्तपत्राला जाहिराती देण्यात आल्या आहेत. या जाहिरातींमध्ये बॉलिवूड अभिनेता आमीर खानचा फोटो वापरला आहे.

जाहिरातीत "पारदर्शकता' हा शब्द ठळकपणे छापण्यात आला असून, याशिवाय पारदर्शकतेला मतदान करण्याचे अप्रत्यक्ष आवाहनही करण्यात आले आहे. त्याचबरोबर "परिवर्तन' या मथळ्याखाली मुंबईतील झोपडपट्टया, खड्डे, पाण्याची समस्या आदींची छायाचित्रे छापण्यात आली आहेत. त्यावर कॉंग्रेसह शिवसेनेने तीव्र आक्षेप घेतला आहे. कॉंग्रेसचे प्रवक्‍ते सचिन सावंत यांनी आज राज्य निवडणूक आयुक्‍त जे. एस. सहारिया यांची भेट घेऊन कारवाई करण्याची मागणी केली.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी प्रचार संपल्यानंतर माध्यमांना मुलाखती देण्याचा धडका सुरू ठेवला आहे. त्याबद्दलही निवडणूक आयोगात तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारींची गंभीर दखल राज्य निवडणूक आयोगाने घेतल्याचे सांगण्यात आले. या संदर्भात संबंधित संस्थेकडे तातडीने खुलासा मागविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

वर्तमानपत्रातील जाहिरात म्हणजे आचारसंहितेचा सरळ भंग होत आहे. प्रचारासाठी जाहिरातीवर बंदी असताना ती छापण्यात आल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाडे तक्रार करण्यात आली.
- अनिल परब, शिवसेना आमदार

प्रचार संपल्यावर भाजप जाहिरात करत असेल तर ती गंभीर बाब आहे. भाजपची अगतिकता यामागे दिसून येते. "मुंबई फर्स्ट' ही संस्था भाजपशी संबंधित असल्याने जाहिरातीमागे थेट भाजपचा हात आहे. या संस्थेने यापूर्वी अनेकदा मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी केली आहे. निवडणूक आयोगाने संस्थेसह भाजपच्या विरोधात गुन्हा दाखल करावा.
- सचिन सावंत, प्रवक्‍ता, कॉंग्रेस

Web Title: complaint on devendra fadnavis & aamir khan