विद्यार्थ्यांच्या पौष्टिक व सकस आहारासाठी व्यापक योजना आखणार : रावल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जुलै 2019

शाळा-महाविद्यालय जवळच्या 50 मीटर परिसरात चिप्स, तळलेले अन्न, बटाटा फ्राईड, गोडपदार्थ विक्रीस प्रतिबंध करणे, कॅन्टीनमध्ये अन्न सुरक्षा मानके कायद्याचे पालन आदीबाबत कार्यशाळेत विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले.

मुंबई : विद्यार्थ्यांचा चटपटीत जंकफूड खाण्याकडे ओढा वाढत चालल्यामुळे आरोग्याच्याही तक्रारी वाढत चालल्या आहेत. जंकफूडचा आरोग्यावर विपरित परिणाम होऊ लागला आहे. म्हणूनच शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित, पौष्टीक व सकस आहारासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी शासन व्यापक उपाययोजना करेल, असे अन्न व औषध प्रशासनमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.

शाळा, कॉलेजमधील विद्यार्थ्यांना पौष्टिक व सकस आहारासंदर्भात ठाणे येथे आज (गुरुवार) आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. शाळा, कॉलेजमधील विध्यार्थ्यांना सुरक्षित, पौष्टिक व सकस आहार मिळावा यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई प्रदेशस्तरीय एकदिवसीय कार्यशाळेचे ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी विविध शाळा व कॉलेजचे प्राचार्य, मुख्याध्यापक, कॅन्टीनचालक तसेच पालक उपस्थित होते. 

स्वस्थ भारत घडवण्यासाठी "जंक फूड हटवूया, स्वस्थ भारत घडवूया" असा संदेश मंत्री रावल यांनी उपस्थितांना दिला. त्याचबरोबर पोषक आहार, खाद्यपदार्थांची सुरक्षा व स्वच्छतेबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाने सुनिश्चित केलेली मार्गदर्शक तत्वे प्रशासनामार्फत राज्यातील 16 हजार 925 शाळा व महाविद्यालयापर्यंत पोहोचविण्यात आली असल्याची माहिती मंत्री रावल यांनी दिली.

संतुलित आहार आणि त्याचे आरोग्यावर परिणाम याची कार्यशाळा वर्षातून एकदा आयोजित करणे. शाळा-महाविद्यालय जवळच्या 50 मीटर परिसरात चिप्स, तळलेले अन्न, बटाटा फ्राईड, गोडपदार्थ विक्रीस प्रतिबंध करणे, कॅन्टीनमध्ये अन्न सुरक्षा मानके कायद्याचे पालन आदीबाबत विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले.

तसेच स्वस्थ व मजबूत भारत निर्माण करण्यासाठी शहराबरोबरच गावात राहणाऱ्या शेवटच्या माणसापर्यंत पौष्टिक, सकस आहार व अन्न सुरक्षाबाबत काळजी घेतली जाईल, असेही मंत्री रावल म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A comprehensive plan for the nutritional and healthy diet of the students will be planned says Rawal