ऑपरेशनसाठी सुई-दोराही नाही... 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 मार्च 2019

ससूनची स्थिती बरी 
राज्यातील इतर वैद्यकीय महाविद्यालयांच्या तुलनेत ससून रुग्णालयाची स्थिती बरी असल्याची माहिती आहे. येथे ग्लोज, सुई-दोरा असले तरी शस्त्रक्रियेसाठी लागणारी अन्य काही साहित्य रुग्णाच्या नातेवाइकांना विकत आणण्यासाठी लिहून दिल्या जातात. त्याचा भुर्दंड रुग्णांवर पडतो. 

पुणे - सुई नाही की दोरा नाही... मग ऑपरेशन करू तरी कसे? कधी ग्लोज तर, कधी बॅंडेज नसते. अशा स्थितीत कोणता डॉक्‍टर ऑपरेशन करेल... असा सवाल राज्याच्या सरकारी रुग्णालयांमधील शल्यचिकित्सकांनी केला आहे. 

राज्यातील आरोग्य खात्याच्या जिल्हा रुग्णालय आणि वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या अंतर्गत वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयांमधील शल्यचिकित्सकांनी "सकाळ'जवळ व्यक्त केलेली ही प्रातिनिधिक भावना आहे. याला वैद्यकीय महाविद्यालयांमधील अधिष्ठात्यांनीही पुष्टी दिली आहे. 

कोणतीही लहान शस्त्रक्रिया म्हटली तरीही त्याला किमान सुई, दोरा, बॅंडेज अशी शस्त्रक्रियेची किमान साधने अत्यावश्‍यक असतातच. पण, सरकारकडून ही साधनेही मिळत नसतील, तर शल्यचिकित्सक शस्त्रक्रिया करणार तरी कसा, असा संतप्त सवाल राज्यातील सरकारी रुग्णालयांमधून विचारला जात आहे. काही दिवस अशी स्थिती असल्यास रुग्णालय पातळीवर काहीतरी खटपट करून रुग्णाला झळ न बसू देता त्याला मदत केली जाते. पण, महिनोंमहिने या स्थितीत बदल होत नसेल आणि बदलाची शक्‍यताही नसेल, तर ऑपरेशन नाही, तर काय करायचे, असा प्रश्‍न डॉक्‍टरांसमोर निर्माण झाला आहे, अशी तीव्र शब्दात भावना नोंदवली आहे. 

का निर्माण झाली ही स्थिती? 
राज्याच्या औषध खरेदी धोरणात बदल करण्यात आला. पूर्वी आरोग्य खाते आणि वैद्यकीय शिक्षण खाते, आपापली औषध खरेदी करत होते. त्यामुळे एकच औषध सरकार दोन वेगवेगळ्या किमतीत खरेदी करत होते. या खरेदी प्रक्रियेत सुसूत्रता येण्यासाठी हाफकिन संस्थेतर्फे औषध खरेदीचा निर्णय घेण्यात आला. गेल्या एक वर्षापासून सुरू झालेली औषधांची खरेदीची आतापर्यंतची प्रक्रिया पूर्ण झाली. मात्र, शस्त्रक्रियेसाठी आवश्‍यक साहित्याची खरेदी प्रक्रिया अद्याप सुरू आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयांमध्ये शस्त्रक्रिया साहित्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. 

औषध खरेदी ही सातत्याने सुरू असणारी प्रक्रिया आहे. त्यात शस्त्रक्रिया साहित्य आणि उपकरणांचाही समावेश आहे. या टप्प्यातील सुई, दोऱ्याची खरेदी झाली आहे. तसेच, बॅंडेजची खरेदी सुरू आहे. दरम्यान, प्रत्येक महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांना स्थानिक पातळीवर खरेदीचे अधिकार दिले आहेत. त्यासाठी त्यांची खर्चाची मर्यादाही वाढविल्याचे हाफकिन संस्थेतर्फे स्पष्ट करण्यात आले. 

ससूनची स्थिती बरी 
राज्यातील इतर वैद्यकीय महाविद्यालयांच्या तुलनेत ससून रुग्णालयाची स्थिती बरी असल्याची माहिती आहे. येथे ग्लोज, सुई-दोरा असले तरी शस्त्रक्रियेसाठी लागणारी अन्य काही साहित्य रुग्णाच्या नातेवाइकांना विकत आणण्यासाठी लिहून दिल्या जातात. त्याचा भुर्दंड रुग्णांवर पडतो. 

सरकारकडून शस्त्रक्रियेसाठी वेगवेगळ्या 116 प्रकारच्या साहित्याचा पुरवठा करणे आवश्‍यक असते. त्यापैकी आतापर्यंत जेमतेम 22 साहित्यांचा पुरवठा करण्यात आला आहे. आतापर्यंत सुई-दोरा, ग्लोअज हेदेखील रुग्णालयात नव्हते. ते आता आले आहे. पण, अजूनही बॅंडेज, प्लॅस्टर मटेरियल अशा बहुतांश साहित्याची प्रतीक्षा आहे. 
- डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, घाटी वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद

 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Condition of government hospitals in maharashtra