अजित पवार-राज ठाकरेंची गोपनीय चर्चा; मनसे आघाडीत येणार?

अजित पवार-राज ठाकरेंची गोपनीय चर्चा; मनसे आघाडीत येणार?

मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केल्यानंतर आज या दोन्ही नेत्यांच्या भेटीनं महाआघाडीच्या "राज'कारणाला मनसे फोडणी मिळाल्याची चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महाआघाडीत सहभागी करून घेण्याच्या दृष्टीने ही भेट अत्यंत महत्वाची मानली जात आहे. दादरस्थित एका बड्‌या बांधकाम व्यावसायिकाच्या मध्यस्थीने अजित पवार व राज यांची भेट घडवून आणल्याचे सूत्रांनी सांगितले.

भाजप व मोदी यांचा पराभव करण्यासाठी राज ठाकरे यांनी आघाडीत सहभागी व्हावे, असे अजित पवार यांनी काल (मंगळवार) सांगितले होते. आज ते मुंबईत असताना सायंकाळी पाचच्या सुमारास राज यांना भेटण्यास दादरला गेले. या दोघांमधील चर्चा समोर आलेली नसली तरी भेट झाल्याची खात्रीलायक माहिती मिळाली.

दरम्यान, मनसेला महाआघाडीत सहभागी करून घेतल्यास कॉंग्रेसची अडचण होवू शकते, अशी अटकळ बांधली जात आहे. त्यामुळे काँग्रेसच्या राष्ट्रीय राजकारणावर याचे विपरीत परिणाम होणार नाहीत, याची दक्षता राष्ट्रवादी घेईल, असे काँग्रेस नेत्यांचे मत होते. मात्र, आज अजित पवार व राज यांच्या भेटीनं या संपूर्ण चर्चेला आता नवीन राजकीय कलाटणी मिळाल्याचे मानले जात आहे.

राष्ट्रवादी व मनसेमध्ये आघाडीबाबत चर्चा सुरू असल्याची बातमी मागील आठवड्‌यातच समोर आली होती. ठाणे, कल्याण अथवा मुंबईतील एक लोकसभेची जागा राष्ट्रवादी स्वत:च्या कोट्‌यातून मनसेला देईल, अशीही चर्चा होती. अशा स्थितीत अजित पवार व राज यांच्या भेटीनंतर या महाआडीत मनसे सहभागी होईल, अशी दाट शक्‍यता वर्तविली जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com