दुधाच्या प्रतवारीबाबत संभ्रम

ज्ञानेश्वर रायते  
गुरुवार, 26 जुलै 2018

भवानीनगर -  दूधदर अनुदानाचा तिढा सोडविताना राज्य सरकारने ३.५ फॅट व ८.५ एसएनएफच्या दुधासाठी ५ रुपये अनुदान जाहीर केले. मात्र, केंद्र सरकारने नव्याने गायीच्या दुधासाठी ३.२ फॅट व ८.३ एसएनएफ ठरवले आहे, त्यामुळे हे दूध स्वीकारावेच लागेल; परंतु त्याला अनुदान मिळणार नसेल, तर त्याचा दर नेमका किती ठरवायचा, हा प्रश्न निर्माण झाला आहे. 

भवानीनगर -  दूधदर अनुदानाचा तिढा सोडविताना राज्य सरकारने ३.५ फॅट व ८.५ एसएनएफच्या दुधासाठी ५ रुपये अनुदान जाहीर केले. मात्र, केंद्र सरकारने नव्याने गायीच्या दुधासाठी ३.२ फॅट व ८.३ एसएनएफ ठरवले आहे, त्यामुळे हे दूध स्वीकारावेच लागेल; परंतु त्याला अनुदान मिळणार नसेल, तर त्याचा दर नेमका किती ठरवायचा, हा प्रश्न निर्माण झाला आहे. 

मुंबईतील आरे डेअरी येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत हा मुद्दा सरकारपुढे उपस्थित झाला असून, राज्य सरकारने घालून दिलेला नियम आणि केंद्राचे नवे धोरण, याचा मेळ कसा घालायचा, हा प्रश्‍न आहे. राज्य सरकारने दुधाचे अनुदान प्रतवारीनुसार ठरवून दिले आहे. ३.५ फॅट व ८.५ एसएनएफ दुधासाठीच अनुदान असेल, त्याखालील दुधाला अनुदान नसल्याचे स्पष्ट केले आहे. मागील काही दिवसांत केंद्र सरकारने नव्याने जाहीर केलेल्या धोरणानुसार, गायीच्या दुधाची प्रत ३.२ फॅट व ८.३ एसएनएफ अशी आहे, त्यामुळे तेही दूध स्वीकारणे बंधनकारक ठरणार आहे. मात्र, ते स्वीकारले तर अनुदानाचे काय, असा प्रश्न दूध प्रकल्पचालकांपुढे आहे. हे दूध स्वीकारण्याचे बंधन असल्याने प्रकल्पचालक याचा फायदा उठविण्याची शक्‍यता आहे. हे दूध प्रतिलिटर २० ते २१ रुपयांनीच स्वीकारले जाण्याची सरकारलाही भीती आहे. 

प्रतिपॉइंट फॅटसाठी फक्त ३० पैसे व एसएनएफच्या प्रतिपॉइंटसाठी ५० पैसे एवढाच दर कमी करावा, त्याखाली कपात झाल्यास दूध उत्पादकांचे नुकसान होऊ शकते, २३ रुपये प्रतिलिटरपेक्षा कमी दराने हे दूध खरेदी होणार नाही, याची काळजी घ्यावी, असा तोडगा काही दूध प्रकल्पचालकांनी सुचविला आहे. मात्र, त्याही अगोदर या प्रतीचे दूध स्वीकारण्यासाठीचे परिपत्रक सरकारला काढावे लागणार आहे. त्याची प्रतीक्षा दूध उत्पादकांनाही करावी लागेल, असे दिसते.

...तर दूध जप्त होईल
सरकारने अनुदानासाठी दुधाची प्रतवारी ठरविताना ३.५ फॅट व ८.५ एसएनएफ हे मानक ठरवून दिले आहे, त्याखालच्या प्रतीसाठी अनुदान मिळणार नसल्याने प्रकल्पचालकांनी यातही पळवाटा शोधत उत्पादकांची कोंडी करायचे धोरण ठेवल्याचे दिसते. राज्यातील काही प्रकल्पांनी बल्क कूलर चालकांना ३.५ फॅट व ८.५ एसएनएफ खाली दूधपुरवठा झाला, तर ते दूध भेसळीचे समजून जप्त केले जाईल, असा इशारा दिला आहे. त्याची पत्रके सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. यावर दुग्धविकास खात्याने कारवाई करावी, अशी दूध उत्पादकांची अपेक्षा आहे. 

Web Title: confusion about the milk-rate

टॅग्स