आघाडीवर 'संक्रांती'चे सावट

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 14 जानेवारी 2017

कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अनुकूल; नेत्यांमध्ये मात्र कटुता

कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अनुकूल; नेत्यांमध्ये मात्र कटुता
मुंबई - जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीसाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन्ही पक्षांमधील आघाडीवर "संक्रांती'चे सावट पसरले आहे. बहुतांश ठिकाणी आघाडीसाठी कार्यकर्ते अनुकूल असले, तरी नेत्यांमधील कटुता मात्र अडचणीचा मुद्दा ठरत आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांमधील राजकीय वर्चस्वाची स्पर्धाच आघाडीतला खोडा असल्याचे सांगत कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत. त्यामुळे या निवडणुकीसाठीही आघाडीच्या चर्चेचे केवळ गुऱ्हाळच कायम राहील, अशी भीती कार्यकर्त्यांमधे आहे.

आतापर्यंत जिल्हा परिषदा व पंचायत समित्या निवडणुकांत कॉंग्रेस-राष्ट्रवादीने कायम स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. या वेळीही तीच परिस्थिती असली, तरी महापालिकांमधे मात्र आघाडी व्हावी, असा कार्यकर्त्यांचा सूर आहे.

मुंबई महापालिकेत कॉंग्रेसची ताकद अधिक असल्याने मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष संजय निरुपम राष्ट्रवादीसोबत चर्चेला तयार नाहीत. तर, पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीची ताकद अधिक असल्याने तिथे कॉंग्रेसला सोबत घेण्याची राष्ट्रवादीच्या नेत्यांची तयारी नाही. ठाणे महापालिकेत दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी आघाडीचा निर्णय घेतला असला, तरी राज्यात सर्वच महापालिकांमध्ये आघाडीची एकत्रित चर्चा व्हावी, असा सूर दोन्ही पक्षातल्या काही वरिष्ठ नेत्यांनी लावला आहे.
राष्ट्रवादीसोबत राज्यात कुठेही आघाडी नको, असा सूर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा आहे, तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह इतर नेत्यांना कॉंग्रेसने मुंबईतल्या आघाडीबाबतही चर्चा करावी असे वाटते. मात्र, पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये कॉंग्रेसची सोबत कशासाठी, असा सवाल राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, दोन्ही पक्षांत आघाडी व्हावी यासाठीची प्राथमिक चर्चा सुरू झाल्याचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले असले, तरी ही चर्चा केवळ दूरध्वनीवरूनच झाली असल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांचे म्हणणे आहे. कॉंग्रेसच्या नेत्यांनी समोरासमोर बसून चर्चेची अद्याप तयारी दाखवली नसल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते करत आहेत.

Web Title: confussion in congress-ncp aghadi