राणेंच्या दिल्लीवारीने खळबळ..!

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 29 मार्च 2017

मुंबई - कॉंग्रेस नेते नारायण राणे यांच्या दिल्लीवारीमुळे पक्षांतराबाबतची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. मात्र ही चर्चा चुकीची असल्याचे आमदार नीतेश राणे यांनी स्पष्ट केले आहे. नारायण राणे हे भाजपच्या वाटेवर असल्याची राजकीय चर्चा गेली अनेक दिवस सुरू आहे. त्यातच राणे यांचे पुत्र माजी खासदार नीलेश यांनी थेट कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवर केलेल्या आरोपामुळे राणे यांच्या पक्षांतराच्या चर्चेला अधिकच उधाण आले होते.

त्यासोबत भाजपचे "चाणक्‍य' चंद्रकांत पाटील यांनी राणे यांच्या पक्षप्रवेशाबाबत टाकलेली गुगली व त्यानंतर राणे यांची दिल्लीवारी यामुळे राज्याचा राजकारणात भूकंप होण्याची शक्‍यता अधिकच गडद झाली होती. मात्र, आमदार नीतेश राणे यांनी नारायण राणे कॉंग्रेस सोडणार नाहीत हे स्पष्ट करत, पक्षांतराची चर्चा संपूर्णपणे चुकीची असल्याचे स्पष्ट केले. राणे यांना बदनाम करण्याचा हा प्रकार असल्याचे नमूद करत कॉंग्रेसमध्ये कशी सुधारणा व्हायला हवी, याबाबत नारायण राणे यांची स्वतंत्र भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नारायण राणे हे काही व्यक्तिगत कामासाठी दिल्लीत गेले होते, असे नीतेश यांनी स्पष्ट करत, अकारण राणे यांच्या भाजपप्रवेशाच्या बातम्या येत असल्याची खंत व्यक्त केली.

दरम्यान, नारायण राणे यांनी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या कार्यपद्धतीबाबत टीका केली आहे; तर राणे यांचे पुत्र माजी खासदार नीलेश राणे यांनी सरचिटणीसपदाचा राजीनामा देत थेट अशोक चव्हाण यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. मात्र कॉंग्रेसमधून कोणत्याही नेत्याने नीलेश यांच्या या भूमिकेला गांभीर्याने घेतले नाही. त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी राणे यांच्या कॉंग्रेसमधील नाराजीबाबत सकारात्मक व्यक्तव्य करत राणे हे भाजपसाठी अस्पृश्‍य नसल्याचे संकेत दिल्याने राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आले होते.

नारायण राणे यांचा भाजपप्रवेश निश्‍चित असल्याची जोरदार चर्चाही सुरू होती.

चुचकारण्याचे प्रयत्न
नवी दिल्ली - नारायण राणे यांच्या दिल्ली दौऱ्यावरून उलटसुलट चर्चा सुरू आहेत; परंतु त्यांच्या कथित नाराजीची कॉंग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने गांभीर्याने दखल घेतली असून पक्षातर्फे राणेंना चुचकारणे सुरू झाल्याचे समजते. राणे यांनी कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींची भेट घेतल्याचेही कळाले. परंतु या भेटीला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.

पक्षात आपली दखल घेतली जात नसल्यावरून अस्वस्थ असलेले नारायण राणे कालपासून दिल्लीत दाखल झाल्यानंतर वेगवेगळ्या वावड्यांना उधाण आले. राणेंच्या भाजपप्रवेशाबाबतही चर्चा सुरू आहेत;

परंतु कॉंग्रेसमधील एका गटाच्या म्हणण्यानुसार राणेंच्या भाजपप्रवेशाच्या किंवा भाजप अध्यक्ष अमित शहांच्या भेटीच्या अफवा या केवळ कॉंग्रेस नेतृत्वाने दखल घ्यावी यासाठीच्या दबावतंत्राचा भाग आहे.

विद्यमान प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर नाराज असलेले नारायण राणे हे स्वतः या पदासाठी इच्छुक असल्याचेही बोलले जाते. त्या पार्श्‍वभूमीवर अशोक चव्हाण यांच्याशी राणेंच्या दिल्ली दौऱ्याविषयी विचारणा केली असता त्यांनी याबाबत आपल्याला काहीही कल्पना नसल्याचे सांगितले; तर राज्याचे प्रभारी सरचिटणीस मोहन प्रकाश हे मध्य प्रदेशातील विधानसभा पोटनिवडणुकीच्या मोहिमेवर असल्यामुळे राणेप्रकरणाबाबत त्यांच्याकडूनही माहिती मिळू शकली नाही. मात्र, महाराष्ट्रात सध्याच्या परिस्थितीत राणेंसारख्या नेत्याची कॉंग्रेसला आवश्‍यकता असल्याने त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Web Title: confussion by narayan rane delhi tour