कॉंग्रेस-राष्ट्रवादीत आता 'या' मुद्द्यावरून रस्सीखेच 

टीम ई-सकाळ
सोमवार, 9 मार्च 2020

लोकसभा निवडणुकीत राज्यात दहा टक्‍क्‍यांच्या आसपास मते घेतल्यामुळे वंचित विकास आघाडीची चर्चा जोरात सुरू झाली होती

मुंबई : वंचित विकास आघाडीचे राजीनामे देऊन बाहेर पडलेल्या पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षात सामावून घेण्यासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन पक्षांमध्ये सध्या रस्सीखेच सुरू आहे. वंचित आघाडीचा राजीनामा दिलेल्या पदाधिकाऱ्यांची कॉंग्रेस, तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षांच्या नेत्यांशी सध्या बोलणी सुरू असून, स्थानिक परिस्थितीचा विचार करून कोणत्या पक्षात प्रवेश करावयाचा याचा निर्णय हे पदाधिकारी घेणार असल्याचे समजते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लोकसभा निवडणुकीत राज्यात दहा टक्‍क्‍यांच्या आसपास मते घेतल्यामुळे वंचित विकास आघाडीची चर्चा जोरात सुरू झाली होती. ‘वंचित’मुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला काही जागांवर पराभवाचा झटका सहन करावा लागला. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत या दोन्ही कॉंग्रेसच्या आघाडी आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात आघाडीत सामील होण्यासाठी चर्चेच्या फैरी झाडल्या. मात्र आंबेडकरांनी सवता सुभा राखत विधानसभा निवडणूक लढवली. यामुळे आघाडीला काही जागा गमवाव्या लागल्या होत्या. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी या तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. तर वंचितमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू झाल्याने ‘वंचित’च्या काही पदाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या पदाचे राजीनामे दिले. यामध्ये वंचितचे महासचिव नवनाथ पडळकर, माजी आमदार हरिभाऊ भदे, माजी आमदार बळीराम शिरसकर यांच्यासह सुमारे 50 हून जास्त पदाधिकाऱ्यांनी वंचितला रामराम केला. 

आणखी वाचा - पुण्याचा तरुण ठरला जगातील सर्वोत्तम आई!

आणखी वाचा - मराठा आरक्षणाबाबत झाली सकारात्मक चर्चा 

या नेत्यांच्या सध्या गाठीभेटी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांशी बोलणी सुरू आहेत. स्थानिक पातळीवरील सोय पाहून कोणत्या पक्षात प्रवेश करावयाचे याचा खल राजीनामे दिलेल्या पदाधिकारी आणि त्यांचे समर्थक यांच्यात सुरू आहे. दोन्ही कॉंग्रेस पक्षात प्रवेश देण्यासाठी अनुकूल असल्याचे या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: congress and ncp differences over vanchit bahujan aghadi leaders