बोगस मतदार वगळण्याची काँग्रेसची मागणी

Congress
Congress

मुंबई  - महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणूक मतदान यंत्राऐवजी (ईव्हीएम) मतपत्रिकेवर घ्यावी, तसेच राज्याच्या मतदार यादीतील ४४ लाख ६१ हजार बोगस मतदारांची नावे तातडीने वगळावीत, अशी मागणी काँग्रेसने देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांच्याकडे केली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी राज्याच्या दौऱ्यावर आलेले मुख्य निवडणूक आयुक्त अरोरा, आयुक्त अशोक लवासा आणि सुशील चंद्रा यांची आज प्रदेश काँग्रेसच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. या वेळी झालेल्या चर्चेत पक्षाचे प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा यांनी निवडणूक प्रकिया मतपत्रिकेच्या माध्यमातूनच राबविण्याची आणि मतदार यादीतील बोगस मतदार वगळण्याची मागणी लावून धरली. लोकसभा निवडणूक होण्यापूर्वी २५ फेब्रुवारी २०१९ रोजी निवडणूक आयोगाने आयोजित केलेल्या बैठकीत प्रदेश काँग्रेसने ४४ लाख ६१ हजार बोगस मतदारांची माहिती पुराव्यांसह दिली होती. मात्र अद्याप हे सगळे मतदार वगळले गेले नाहीत, असे शर्मा यांनी आयोगाच्या निदर्शनास अणून दिले. त्यावर, दोन लाख १६ हजार बोगस मतदारांची नावे यादीतून वगळली असून, उर्वरित मतदारांची नावे वगळण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे अरोरा यांनी सांगितले.

या संदर्भात प्रसारमाध्यमांकडे प्रतिक्रिया व्यक्त करताना शर्मा यांनी बोगस मतदारांची नावे वगळण्याबाबत आयोगाकडून दिरंगाई होत असल्याचा आरोप केला. मुक्त व निर्भय वातावरणात निष्पक्ष निवडणूक प्रक्रिया राबविण्याकरिता मतदार यादीतून बोगस मतदारांची नावे तत्काळ वगळण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. ‘ईव्हीएम’वर जनतेचा विश्वास नसल्याने आगामी विधानसभा निवडणूक मतदान पत्रिकेवर घेण्याची मागणी बहुतांश राजकीय पक्षांनी केली आहे. ही मागणी निवडणूक आयोगाने तत्काळ मान्य करावी, असा आग्रहदेखील त्यांनी धरला.

४४ लाख ६१ हजार बोगस मतदार (काँग्रेसचा दावा)
२ लाख १६ हजार यादीतून वगळलेले बोगस मतदार (निवडणूक आयोगाची माहिती)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com