वंचित आघाडीचा प्रस्ताव पाहून काँग्रेसला फुटला घाम

सकाळ न्यूज नेटवर्क 
बुधवार, 3 जुलै 2019

राज्यात जवळपास साठ वर्षे सत्तेत असलेल्या कॉंग्रेस पक्षाला आघाडीत घेण्याची तयारी वंचित बहुजन आघाडीने दाखवली आहे. इतकेच नव्हे, तर कॉंग्रेसने मागणी करण्याअगोदरच त्यांना 40 जागा सोडण्याची तयारीही "वंचित'ने दाखवली आहे.

मुंबई : राज्यात जवळपास साठ वर्षे सत्तेत असलेल्या कॉंग्रेस पक्षाला आघाडीत घेण्याची तयारी वंचित बहुजन आघाडीने दाखवली आहे. इतकेच नव्हे, तर कॉंग्रेसने मागणी करण्याअगोदरच त्यांना 40 जागा सोडण्याची तयारीही "वंचित'ने दाखवली आहे. मात्र, येत्या दहा दिवसांत वंचितचा हा प्रस्ताव कॉंग्रेसने स्वीकारला नाही, तर विधानसभा निवडणुकीत सर्वच्या सर्व 288 जागा लढविण्याचा मनोदय वंचित आघाडीने जाहीर केला आहे. 

लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला चकवा देत वंचित बहुजन आघाडीने जोरदार मुसंडी मारत दहा ते बारा जागांपासून कॉंग्रेस आघाडीला दूर ठेवले होते. वंचितने एकही जागा जिंकली नसली, तरी कॉंग्रेसपेक्षा अधिक मते लोकसभा निवडणुकीत मिळवल्याचा दावा केला आहे. त्यामुळेच कॉंग्रेससोबत न जाता कॉंग्रेसला आघाडीत घेण्याची तयारी वंचितने दाखवली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत कॉंग्रेससमोर हा प्रस्ताव ठेवला. ते म्हणाले, की आमची 288 विधानसभा लढायची तयारी आहेच, मात्र आमची कॉंग्रेसला 40 जागा देण्याची तयारी आहे. कॉंग्रेसला हा प्रस्ताव मान्य असल्यास त्यांनी येत्या दहा दिवसांत वंचित आघाडीच्या कार्यालयात अधिकृतपणे सांगावे, असेही कळवले आहे. 

कॉंग्रेसला कोणत्या 40 जागा पाहिजेत, हे त्यांनी सांगावे, अशा शब्दांत वंचितने कॉंग्रेसला जागा निवडण्याची संधी दिली आहे. आम्हाला जास्त मते मिळाली आहेत. त्यामुळे आम्ही ठरवणार कॉंग्रेसला किती जागा द्यायच्या. कॉंग्रेसने ठरवावे त्यांना कोणत्या जागा हव्यात, असे पडळकर यांनी सांगितले. 

ज्यांना कॉंग्रेस अथवा भाजपमध्ये तिकीट मिळणार नाही, ते आमच्या संपर्कात आहेत. आम्ही भाजपची बी टीम आहोत, असा कॉंग्रेसने आमच्यावर आरोप केला होता. त्याचा खुलासा अजूनही कॉंग्रेसने केला नाही. कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी राहुल गांधी आणि प्रकाश आंबेडकरांची भेट होऊ दिली नाही. 
गोपीचंद पडळकर, नेते, वंचित बहुजन आघाडी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress is in Difficulties due to VBA Proposal