
Nana Patole : नाना पटोलेंचं प्रदेशाध्यक्षपद जाणार? पक्षश्रेष्ठींकडून थोरात प्रकरणाची गंभीर दखल
मुंबईः काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांंच्या प्रदेशाध्यक्ष पदासंदर्भात पक्षश्रेष्ठी गंभीर विचार करत असल्याची माहिती आहे. थोरात प्रकरणावरुन पक्षामध्ये दोन गट पडल्याचं चित्र दिसून येतंय.
नाशिक पदवीधर मतदारसंघामधून काँग्रेसमध्ये अंतर्गत वादाची ठिणगी पडली आहे. काँग्रेसकडून सत्यजीत तांबे यांना एबी फॉर्म देण्याऐवजी त्यांचे वडील सुधीर तांबे यांना एबी फॉर्म देण्यात आला. त्यानंतर सुधीर तांबेंनी उमेदवारी अर्जच दाखल केला नाही.
सत्यजीत तांबे यांनी मात्र अपक्ष अर्ज दाखल करुन निवडणुकीत विजय मिळवला. काँग्रेसने सत्यजीत तांबेंसाठी कोरे एबी फॉर्म दिल्याचा दावा केला तर सत्यजीत तांबेंनी तो दावा फेटाळून लावत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर आक्षेप घेतले.
या सगळ्या घमासानात सत्यजीत तांबे यांचं मामा आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची भूमिका काय? असा प्रश्न उपस्थित होत होता. चार दिवसांपूर्वी थोरातांना प्रकृती अस्वस्थ्यामुळे सोशल मीडियाद्वारे भूमिका स्पष्ट केली. आम्ही काँग्रेसच्या विचारांसोबत आहोत, असं थोरात म्हणाले होते.
त्यानंतर परवा बाळासाहेब थोरात यांनी विधानसभा गटनेते पादाचा राजीनामा दिला आणि एकच खळबळ उडाली. पक्षश्रेष्ठींनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याची माहिती आहे. शिवाय विजय वडेट्टीवार, आशिष देशमुख, सुनील केदार यांनी पटोलेंवर नाराजी व्यक्त केली. त्यामुळे नाना पोटोले यांचं पद जावू शकतं, अशी माहिती आहे. 'साम टीव्ही'ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
दरम्यान, महाराष्ट्र काँग्रेसमधील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, राज्याचे प्रभारी एच. के. पाटील (H. K. Patil) मुंबईत दाखल झाले आहेत. एच. के. पाटील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते थोरातांची भेट घेणार असून या भेटीत नेमकं काय घडतंय हे पाहावं लागणार आहे.