'आता भाजपावाले धरणातील पाणी ओंजळीने पितील'

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

या घटनाक्रमावर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ‘भाजपावाले धरणातील पाणी ओंजळीने पितील’, असे एक ट्विट करून भाजपाला टोला लगावला आहे.

मुंबई :  कालपासून घडत असलेल्या राजकीय घटनांमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. काल सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची व अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. काही काळातच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले की, हा अजित पवार यांचा वैयक्तीक निर्णय आहे. या निर्णयाशी पक्षाचा काहीही संबंध नाही. यामुळे एक चित्र स्पष्ट झाले की, अजित पवार यांनी पक्षाविरूद्ध काही आमदारांना घेऊन बंड केले. यावर सचिन सावंत यांनी व्टिट करत भाजपवर व अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

शुक्रवारी रात्रीपर्यंत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचं सरकार राज्यामध्ये स्थापन होईल, असे चित्र दिसत असतानाच अचानक शनिवारी सकाळी राज्यात भाजपाने सत्ता स्थापनेचा दावा केला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची, तर राष्ट्रवादीचे अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

या घटनाक्रमावर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ‘भाजपावाले धरणातील पाणी ओंजळीने पितील’, असे एक ट्विट करून भाजपाला टोला लगावला आहे. “सिरियल किलर कडून लोकशाहीचा पुन्हा खुन! आता अजित पवार यांच्यावरील सर्व गुन्हे माफ होतील. भाजपा वाले धरणातील पाणी ओंजळीने पितिल! आणि आपण किती नैतिक आहोत, याचा डंका पिटवतील. रात्रीच्या अंधारात अनैतिक कर्म करण्यास मदत करणाऱ्या राष्ट्रपती व राज्यपालांबद्दल काय म्हणावे? वाईट आहे!”, असे ट्विट त्यांनी केले आहे.

दरम्यान, राज्यात झालेल्या घटना घडामोडीचा राष्ट्रवादीलाही धक्का बसला आहे. यावर शरद पवार यांनीही या प्रकरणावर आपली बाजू मांडली आहे. पवार यांनी स्पष्ट केलं की, कोणतीही कल्पना न देता आमदारांना राजभवनात नेण्यात आलं. विशेष म्हणजे आमदारांच्या सह्या असलेल्या पाठिंब्याचं पत्र दाखवून राजपालांची फसवणूक करण्यात आली. अजित पवारांबरोबर दहा ते बारा आमदार आहेत.

शपथविधी सोहळ्यानंतर राजेंद्र शिंगणे माझ्या घरी आले. महाराष्ट्रात जनमत जे आहे ते भाजपाच्या विरोधात आहे. असं असताना त्यांच्यासोबत जाण्याच्या निर्णयाला जनता पूर्ण विरोध दर्शवेल”, असे शरद पवार म्हणाले. याशिवाय, जे आमदार अपात्र होतील, त्यांच्याविरोधात आम्ही तीन पक्ष काय करायचं ते करु,” असंही पवारांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: congress leader sachin sawant taunt bjp over ajit pawar support vidhan sabha elections 2019