Vidhan Sabha 2019 : पाच वर्षांत 73 हजार कोटींचे घोटाळे; काँग्रेसच्या बड्या नेत्याची टीका

CM-Devendra-Fadnavis
CM-Devendra-Fadnavis

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली आहे, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे नेते राज्यातील जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर का बोलत नाहीत? भाजप-शिवसेना सरकारच्या काळात राज्यात एकही नवीन प्रकल्प आला नाही. पाच वर्षाच्या कारभारात 73 हजार कोटींचे घोटाळे या सरकारने केले, असा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

राजीव गांधी भवन येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, ही निवडणूक राज्यातील फडणवीस सरकारच्या पाच वर्षाच्या कामकाजाचे मूल्यमापन करणारी आहे. गेल्या पाच वर्षात त्यांनी राज्यासाठी काय केले? याचा हिशोब जनतेला द्यायला हवा, पण मुख्यमंत्री मात्र मूळ प्रश्नांना बगल देत कलम 370 आणि काश्‍मीरबाबत बोलून जनतेची दिशाभूल करत आहेत, हे आता लोकांच्या लक्षात आले आहे.

भाजप सरकारच्या काळातच देशाची अर्थव्यवस्था चिंताजनक वळणावर पोहोचली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अध्यक्षांनी अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली. नेपाळ आणि बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेचा वेग भारताच्या अर्थव्यवस्थेपेक्षा जास्त राहील, असा अंदाज जागतिक बँकेने वर्तवला आहे. यावर उपाययोजना करण्याऐवजी केंद्र सरकारचे मंत्री अर्थव्यस्थेबद्दल बेताल वक्तव्ये करत आहेत, हे दुर्देवी आहे, असे चव्हाण म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, रिझर्व्ह बँकेच्या अहवालानुसार सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये 73 हजार कोटींचे घोटाळे झाले आहेत. मोदी सरकारच्या काळात बँक घोटाळे सात पटीने वाढले आहेत. पीएमसी घोटाळ्यात ठेवीदारांचे पैसे संकटात आले आहेत. बँकिंग नियमाचे उल्लंघन करून एका उद्योगपतीला 73 टक्के कर्ज वाटप केले, तेव्हा राज्याचे आणि केंद्राचे सहकार खाते काय झोपले होते का? घोटाळेबाजांचे सरकारमधील उच्च पदस्थांशी संबंध असल्याचा आरोप करून घोटाळेबाजांची नावे जाहीर करावीत आणि त्यांच्यावर कारवाई करावी, असे चव्हाण म्हणाले.

हे आहेत घोटाळे

फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रकाश मेहता यांच्यावर गंभीर घोटाळ्याचे आरोप आहेत. मुख्यमंत्र्यांनी फक्त त्यांचे तिकीट कापले आहे. त्यांच्या घोटाळ्याची चौकशी करून त्यांच्यावर खटले का भरले नाहीत? लोकायुक्तांच्या अहवालात प्रकाश मेहतांवर ठपका ठेवला आहे. मेहतांनी मुख्यमंत्र्यांना अवगत केले आहे, असा शेरा लिहिला होता. त्याबाबत लोकायुक्तांनी मुख्यमंत्र्यांची चौकशी केली का? हे स्पष्ट करावे. तसेच सरकारने चौकशी अहवाल जाहीर करावा.

औषध घोटाळ्याच्या चौकशीचे काय झाले? भोसरी एमआयडीसी प्रकरणाचा चौकशी अहवाल जनतेसमोर का ठेवला नाही? मुंबई डीपी प्लानमध्ये 10 हजार कोटींचा घोटाळा झाला होता, असा आरोप तत्कालीन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटलांनी केला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांचे काय म्हणणे आहे? ते त्यांनी स्पष्ट करावे, असे चव्हाण म्हणाले.

शिक्षणाचा स्तर घसरला

मुख्यमंत्र्यांनी दावा केला की, महाराष्ट्र शालेय शिक्षणात तिसऱ्या स्थानावर आहे, पण वस्तुस्थिती ही आहे की, 30 सप्टेंबर रोजी नीती आयोगाने प्रकाशित केलेल्या School Education Quality Index (SEQI) मध्ये महाराष्ट्र सहाव्या स्थानावर घसरला आहे.

नीती आयोगाच्या अहवालानुसार, राज्यातील आरोग्य सुविधादेखील डबघाईला आली असून संपूर्ण देशात महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याचा आरोग्य सुविधेच्या बाबतीत दहावा क्रमांक आहे, हे महाराष्ट्राचे खरे भीषण वास्तव आहे, पण मुख्यमंत्री मात्र खोटे बोलून जनतेची दिशाभूल करत आहेत. जनतेला भाजपचे खरे रूप कळाले असून या निवडणुकीत जनता भाजपला पराभूत करून पुन्हा काँग्रेस आघाडीचे सरकार आणेल, असा विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com