धुळ्यातील घटना सरकारच्या निष्क्रियतेमुळे : अशोक चव्हाण

Ashok Chavan
Ashok Chavan

मुंबई : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात मुले चोरणारी टोळी असल्याच्या संशयावरून जमावाने पाच जणांची ठेचून केल्याची घटना अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागातून अशा घटना समोर येत आहेत त्यावर प्रतिबंधात्मक उपाय करण्याऐवजी गृहविभाग या घटनांचा मुकदर्शक झाल्यानेच अशा घटना वाढत आहेत. धुळ्यातील जमावाकडून झालेल्या पाच जणांच्या हत्येला सरकारची निष्क्रियताच जबाबदार आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे.

धुळे जिल्ह्यातल्या या अमानुष घटनेचा तीव्र शब्दात निषेध करून चव्हाण म्हणाले की, महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे की जंगलराज आहे? असा प्रश्न पडावा एवढी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडीयावर मुले पळवून नेणा-या टोळीबाबत अफवा पसरवल्या जात आहेत. या अफवांमुळे राज्याच्या विविध भागात यापुर्वी जमावाकडून मारहाणीच्या घटना झाल्या आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यात जमावाकडून झालेल्या अशाच मारहाणीत दोन लोकांचा मृत्यू झालेला आहे. राज्याच्या विविध भागातून रोज जमावाने मुले पळवणारे समजून लोकांना मारहाण केल्याच्या घटना समोर येत आहेत. पण सरकार आणि पोलीस प्रशासनाने सोशल मिडीयावरील अफवा आणि मारहाणीच्या घटना रोखण्यासाठी काहीच प्रतिबंधात्मक उपाययोजना केली नाही. उलट सरकार निष्क्रियपणे या घटना पाहात बसले आहे. त्यामुळे अशा घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. जळगाव जिल्ह्यात अशाच एका घटनेमध्ये भाजपाच्या आमदाराने लोकांचा जमाव सोबत घेऊन मुले पळविणा-या टोळीचे सदस्य असल्याच्या संशयावरून बहुरुप्यांना जबर मारहाण केली होती. पण पोलिसांनी या भाजप आमदारावर काहीच कारवाई केली नाही.  त्यानंतर राज्यभरात अशा घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. धुळ्यातील घटनास्थळी पोलीस पोहोचले पण त्यांनाही जमावाकडून मारहाण करण्यात आली. मुख्यमंत्र्यांकडेच गृहखाते आहे पण त्यांचे गृहखात्यावर नियंत्रण नाही, त्यामुळेच अशा घटना घडत आहेत. सरकारने अफवा पसरवणा-यांवर कारवाई करावी. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कायदा हातात घेऊ नये असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com