आता जनताच म्हणते, 'अब की बार, बस कर यार'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 जानेवारी 2019

पेण : जनतेला खोटी आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या भाजप सरकारला जनता कंटाळली आहे. 'अब की बार, बस कर यार', असे जनता आता म्हणत आहे, असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी आज पेण येथे केले.

पेण : जनतेला खोटी आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या भाजप सरकारला जनता कंटाळली आहे. 'अब की बार, बस कर यार', असे जनता आता म्हणत आहे, असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी आज पेण येथे केले.

अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जनसंघर्ष यात्रेचे आज पेणमध्ये आगमन झाले. यावेळी पेण शहरातील महात्मा गांधी मंदिर येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार हुसेन दलवाई, जिल्हाध्यक्ष माणिकराव जगताप, महिला जिल्हाध्यक्ष श्रद्धा ठाकूर, प्रवक्ते सचिन सावंत, महेंद्र घरत, ज्येष्ठ नेते बाळाजी म्हात्रे, जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत पाटील, प्रभारी तालुकाध्यक्ष अशोक मोकल, माजी सभापती सुरेश म्हात्रे यांचे पदाधिकारी उपस्थित होते. 

यावेळी अशोक चव्हाण म्हणाले, की आगामी निवडणुकीत जनता या भाजप सरकारला घरी बसविल्याशिवाय राहणार नाही. अशोक चव्हाण यांनी म्हटले, की महाराष्ट्रावर पाच लाख कोटींचे कर्ज करून हे सरकार फक्त जाहिरातीवर खर्च करत आहे. सत्तेतून पैसा व पैशांतून सत्ता हे एकच धोरण हे सरकार राबवित असल्याची टीकाही अशोक चव्हाण यांनी केली. पैशांच्या जोरावर हे सरकार पुन्हा राज्य करण्याचे स्वप्न पाहत आहे. मात्र, जनतेने आता घराबाहेर पडून यांना यांची जागा दाखवून दिली पाहिजे.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली घटना बदलण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

माझी भाषणे पोलिस रेकॉर्ड करुन मुख्यमंत्र्यांना पाठवत आहेत. व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालण्याचे काम सुरु आहे..साहित्यिकांना बोलण्यास मज्जाव केला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारकाचे तीनवेळा भूमिपूजन केले. मात्र ते स्मारक झाले नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी शंभर कोटींचा निधी मंजूर केला. पुढील निवडणुका होईपर्यंत कोणतेही स्मारक हे पूर्ण करणार नसल्याची टीका अशोक चव्हाण यांनी यावेळी केली.

नुसता चरखा फिरवून कोणी महात्मा गांधी होत नाही

नुसता चरखा फिरवून कोणी महात्मा गांधी होत नाही. त्यासाठी त्यांचे विचार आत्मसात करणे गरजेचे आहे. रायगड जिल्ह्यात काँग्रेसला कोणी गृहीत धरु नये की एकतर्फी प्रेम चालणार नाही, असा सूचक इशाराही अशोक चव्हाण यांनी संभाव्य आघाडीमधील राष्ट्रवादी व शेकापच्या नेत्यांना यावेळी दिला.

रविशेठ पाटील यांच्यासाठी काँग्रेसचे दार खुले

काँग्रेस हा जगन्नाथाचा रथ आहे, हा रथ कोणासाठी थांबणार नाही. ज्यांना अजूनही सामील व्हायचे आहे, त्यांनी सामील व्हावे, असे सांगून माजी मंत्री रविशेठ पाटील यांच्यासाठी आजही काँग्रेसचे दरवाजे उघडे असल्याचे म्हटले.

भाजप सरकारने देशाची अर्थव्यवस्था मोडीत काढली : थोरात

केंद्र व राज्यातील भाजप सरकारने देशाची अर्थव्यवस्था मोडीत काढली आहे .उद्योगधंदे संपले, व्यापारीही संपले असल्याची टीका माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केली. मोदी सरकारचे एक तरी चांगले काम दाखवा, असेही ते म्हणाले.

योजनांची नावे बदलून उद्घाटन करण्याचे भाजपचे काम : जगताप

काँग्रेस सरकारच्या काळातील योजनांची नावे बदलून फक्त त्यांचे उद्घाटन करण्याचे काम भाजप सरकार करत असल्याचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष माणिकराव जगताप यांनी यावेळी सांगितले. रायगडमधील काँग्रेसला मजबूत करण्याचे काम करणार असल्याचे जगताप यांनी म्हटले.

Web Title: Congress Leader Ashok Chavan Criticizes Prime Minister Narendra Modi