
Nana Patole : 'एक दाढीवाला अन् एक बिनामिशीवाला..', पटोलेंनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे काढले वाभाडे
मुंबईः पोलिस भरतीमध्ये झालेल्या गैरव्यवहारावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. शिवाय त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
नाना पटोले म्हणाले की, मुंबईतील पोलिस भरतीत घोटाळा झाला आहे. ७ हजार जागा होत्या. भरतीसाठी ८४ हजार तरुण-तरुणी आल्या होत्या. मात्र दहा लाख रुपयांत पेपर फोडला. ज्यांनी पैसे दिले ते पास आणि ज्यांनी नाही दिले ते नापास, असा आरोप पटोले यांनी केला. तसेच सरकार 1000 कोटी प्रचारासाठी आणि प्रसिद्धी साठी खर्च करत आहेत. इकडे लोक रडत आहेत आणि हे हसत आहे. एक दाढीवाला आणि एक बिना मिशीवाला असं म्हणत, नाना पटोले यांनी शिंदे-फडणवीसांवर हल्लाबोल केला.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्या वतीने हाथ से हाथ जोडो अभियान राबविण्यात येत आहे. कल्याण डोंबिवली मधील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे गुरुवारी डोंबिवलीत आले होते. यावेळी संतोष केणे, सचिन पोटे यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री व्हायला आवडेल का? यावर बोलताना पटोले म्हणाले, कार्यकर्त्यांचा उत्साह आहे, पण महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची सत्ता आली पाहिजे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्याच मनात तसं नाही, तर जनतेच्या मनात सुद्धा तसं आहे आणि मुख्यमंत्रीपदाचा निर्णय हायकमांड घेते. त्यामुळे कार्यकर्त्यांचा अतिउत्साह आहे आणि कार्यकर्त्यांना ही माझी विनंती आहे आधी तुमच्या भागातले आमदार निवडून आणा. त्यासाठी लोकांमध्ये जा आणि जास्तीत जास्त आमदार आपापल्या भागातून निवडून आणा, मग काँग्रेसचे मुख्यमंत्री होणारच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.