कॉंग्रेस नेत्यांचा जनाधार तोळामास

सिद्धेश्‍वर डुकरे
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

मुंबई - राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांत कॉंग्रेसने बाजी मारली आहे. या सरसीमुळे राज्यातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह संचारला असला, तरी राज्य पातळीवरील महत्त्वाच्या नेत्यांचा जनाधार तोळामासा असल्याचे अलीकडेच झालेल्या नगर परिषदा, नगरपंचायत, महापालिका निवडणूक निकालांवरून सिद्ध झाले आहे. या नेत्यांच्या जिल्ह्यातील पालिकांत त्यांना आपले गड राखता आले नाहीत. त्यामुळे इतर राज्यांतील कॉंग्रेस पक्षाच्या विजयाने राज्यातील परिस्थिती सुधारणार नाही. त्यासाठी कॉंग्रेस पक्षाच्या सर्व नेत्यांनी आपापसातील गटतट, मतभेद विसरून कामाला लागले, तरच राज्याही सत्तांतर होऊ शकते, असी चर्चा कार्यकर्त्यांत रंगली आहे.

केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर राज्यात झालेल्या कोणत्याही निवडणुकीत भाजपची सरशी झाली आहे. देशपातळीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झंझावातापुढे कॉंग्रेसला मागील चार वर्षांत अनेक पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मात्र तीन राज्यांच्या ताज्या निकालाने कॉंग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यात उत्साह संचारला आहे. राज्यातील कॉंग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनीदेखील या निकालांचा आनंद साजरा केला आहे. मात्र, दोनच दिवसांपूर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कॉंग्रेसच्या नेत्यांना आपापल्या जिल्ह्यातले गड राखता आले नाहीत.

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या नांदेड जिल्ह्यातील लोहा नगर परिषदेच्या 17 पैकी 13 जागा भाजपने पटकावल्या आहेत; तर कॉंग्रेसला येथे केवळ 4 जागा मिळाल्या आहेत; तर 8 वर्षे प्रदेशाध्यक्ष राहिलेले माणिकराव ठाकरे यांच्या यवतमाळ जिल्ह्यातील नेर-नबाबपूर परिषदेत कॉंग्रेसला केवळ चार जागा मिळाल्या असून शिवसेनेने 9 पटकावल्या आहेत. तीच अवस्था वाशीम जिल्ह्यातील रिसोड परिषदेमध्ये असून तेथे केवळ 3 जागा कॉंग्रेसला आहेत.

याबरोबरच विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना त्यांच्या जिल्ह्यात, नगर महापालिका निवडणुकीत कॉंग्रेसला यश मिळवून देता आले नाही. या जिल्ह्यातील कॉंग्रेसचे मातब्बर नेते बाळासाहेब थोरात यांनादेखील ही किमया साधता आली नाही. तीच अवस्था नागपूरमध्ये कॉंग्रेसची आहे.

विजय वडेट्टीवार ठरले अपवाद
शिवसैनिक असलेले मात्र कॉंग्रेस पक्षात स्थिरावलेले विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी नगर परिषद ताब्यात घेत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना झटका दिला. वडेट्टीवार यांनी दहा जागा कॉंग्रेसला मिळवून दिल्या आहेत.

Web Title: Congress Leader Politics