गल्लीपासून दिल्लीपर्यंत पोहोच असणारा दबंग नेता... सुनील केदार

वीरेंद्रकुमार जोगी
सोमवार, 30 डिसेंबर 2019

गल्लीपासून दिल्लीपर्यंत पोच असणारा हा नेता राजकारणापेक्षा लोककारणावर अधिक भर देतो. म्हणूनच बेरोजगार युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी धडपडणारा हा नेता युवकांच्या मनावर अधिराज्य गाजवितो. शेतकऱ्यांना आपलासा वाटतो, प्रशासकांना सांभाळून घेतो, महिलांना स्वबळावर उभे करण्यासाठी बचत गटांच्या माध्यमातून त्यांचे सक्षमीकरण करतो आहे. 

नागपूर : जिल्ह्यात सहकाराची मुहुर्तमेढ रोवणारे माजी मंत्री व सहकार महर्षी बाबासाहेब केदार यांचे पुत्र सुनील केदार हे जिल्ह्यातील दंबग नेते म्हणून ओळखले जातात. सर्वसामान्यांसाठी अर्ध्यारात्री मदतीसाठी धावून जाणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. नागपूर जिल्ह्याच्या राजकारणावर पकड असलेल्या हा नेता जरी कठोर दिसत असला तरी तो मनमिळावू आहे. राजकारण नव्हे तर लोककारण हे त्यांच्या 27 वर्षांतल्या राजकीय वाटचालीचे सूत्र आहे. महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात त्यांनी कॉंग्रेसकडून कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. 

Image may contain: 18 people, people smiling, crowd

1992 साली जिल्हा परिषद सदस्य म्हणून राजकीय कारकीर्द सुरू करणारे सुनील केदार यांनी सुरुवातीपासूनच त्याचे वडील बाबासाहेब केदार यांचा राजकीय वारसा चालविण्याचा प्रयत्न केला आहे. तीन वर्षे जिल्हा परिषद सदस्य असलेल्या केदार यांनी 1995 साली कॉंग्रेसकडे सावनेर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितली. मात्र, कॉंग्रेसने उमेदवारी नाकारली. यामुळे अपक्ष निवडणूक लढवित त्यांनी या निवडणुकीत लोकमान्यता मिळवित विजय मिळविला. लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवित त्यांनी सावनेर मतदारसंघातील लोकांची कधीच निराशा होऊ दिली नाही. युती सरकारच्या काळात त्यांना उर्जा व परिवहन राज्यमंत्री पद मिळाले. एसटीचा कायापालट करण्यासाठी त्यांनी अनेक नवे उपक्रम याच काळात सुरू केले. उर्जा राज्यमंत्री असताना त्यांनी स्थानिकांना काम मिळावे यासाठी केलेल्या प्रयत्नातूनच आज स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाली आहे.

Image may contain: 9 people, people standing

 

2004 च्या निवडणुकीत पुन्हा एकदा सावनेर मतदारसंघातून अपक्ष विजय मिळविला. याचवेळी राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीची सत्ता होती. लोकांची कामे करण्याचा धडका त्यांनी याच काळात सुरू केला. पाटणसावंगी येथील बंद पडलेला साखर कारखाना विकत घेत त्या ठिकाणी बाबासाहेब केदार सूत गिरणीची स्थापना करून रोजगाराचे साधन स्थानिकांसाठी उपलब्ध करून दिले. जिल्ह्यातील सहकार क्षेत्राला अधिक मजबूत करण्याचा धडाका या काळात लावला. बाजार समित्यांना अधिक बळकटी यावी यासाठी ते जातीने लक्ष देत होते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी निगडित असलेल्या सर्व संस्था अधिकाधिक मजबूत करण्यात केदार यांचा मोठा वाटा आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी 2014 साली केंद्र सरकारकडून निधी मिळवून देण्यात त्यांनी घेतलेला पुढाकार महत्त्वाचा ठरला. 

Image may contain: 5 people, outdoor

लोकांचा लाडका नेता

2009 साली ते कॉंग्रेसच्या उमेदवारीवर सावनेर मतदारसंघातून पुन्हा निवडून आले. 2014 साली देशात मोदी लहर असताना जिल्ह्यातील एकमेव कॉंग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले. नागपूर जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघात 11 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी ठरले असताना सावनेरमध्ये सुनील केदार यांनी विजय मिळवून त्याच्या लोकमान्यतेवर शिक्कामोर्तबच झाले. लोकांचा लाडका नेता म्हणून त्यांना संपूर्ण जिल्ह्याने मान्यता दिली. राज्यात युतीचे सरकार आले असताना त्यांनी जिल्ह्यात एकाकी कॉंग्रेसचा किल्ला लढविला. भाजप सरकारच्या काळात जिल्ह्यातील प्रश्‍नांना वाचा फोडून त्यांनी लोकहिताचा लढा सुरू केला. आंदोलने करून कॉंग्रेसला बळकटी दिलीच शिवाय लोकांचे प्रश्‍न सोडविले. 

Image may contain: 9 people, people sitting

सावनेरच्या विकासात केदार यांचा महत्त्वाचा हातभार

सावनेर मतदारसंघात फिरताना रत्यावर एकही खड्डा आढळणार नाही याची खबरदारी ते स्वत: जातीने घेतात. सावनेर मतदारसंघातून जाणारे प्रशस्त रस्ते हे त्याचे उदाहरण आहे. प्रशासनात काम अडकले असेल तर सुनीलबाबूंची आठवण काढताच ते काम लगेच होते, असा अनेकांचा अनुभव आहे. सावनेरच्या विकासात केदार यांचा महत्त्वाचा हातभार आहे. बेरोजगार युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी धडपडणारा हा नेता युवकांच्या मनावर अधिराज्य गाजवितो. शेतकऱ्यांना आपलासा वाटतो, प्रशासकांना सांभाळून घेतो, महिलांना स्वबळावर उभे करण्यासाठी बचत गटांच्या माध्यमातून त्यांचे सक्षमीकरण करतो आहे. आपल्या कार्यकर्त्यांसाठी व मतदारसंघातील प्रत्येकासाठी तो कोणत्याही क्षणी कुठेही पोहोचतो. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress leader sunil kedar sworn in as cabinet minister of maharashtra