... तर भाजपच्या 'काँग्रेस मुक्त' स्वप्नाची सुरूवात मुंबईतून होईल

संदीप खांडगे पाटील
बुधवार, 10 मे 2017

शिवसेना-भाजपातील वादामुळे तिसऱ्या क्रमांकांवर येऊनही काँग्रेसला महापालिकेत विरोधी पक्षनेतेपद मिळाले असले तरी महापालिकेत विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसला गेल्या काही महिन्यात आक्रमकपणे आपला ठसा उमटवता आलेला नाही. शिवसेना-भाजपातील कलगीतुऱ्यामुळेच महापालिकेत काँग्रेस विरोधी पक्षनेतेपद असूनही अडगळीत पडल्यासारखाच आहे.

मुंबई : मुंबईतील काँग्रेसमधील पडझड रोखण्यासाठी दिल्ली हायकमांडने वेळीच पाऊल न उचलल्यास भाजपाचे काँग्रेसमुक्त भारत या स्वप्नाची मुंबईतूनच सुरूवात झालेली पहावयास मिळेल अशी भीती व्यक्त करतानाच मुंबईकडे लक्ष द्या अशी मागणी काँग्रेसच्या काही नगरसेवकांकडून आणि पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. 

मुंबई महापालिका निवडणुकीत पक्षाचा झालेला दारुण पराभव, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या राजीनाम्याचाअद्यापि प्रलंबित प्रश्‍न, त्यातच गुरुदास कामतांची वारंवार उफाळून येणारी नाराजी याकडे नगरसेवकांनी लक्ष वेधले आहे. महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपा स्वबळावर लढूनही काँग्रेसच्या पदरी दारुण अपयशच आले. निवडणुकीपूर्वीच कामत-निरुपम गटातील अंतर्गत वाद उफाळून आला होता.

महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रातील बित्तंबातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

नारायण राणे, नसीम खान यांच्यासह अन्य नेत्यांनी आपण काँग्रेसच्या उमेदवारांचा महापालिका निवडणुकीत प्रचार करणार नसल्याची भूमिका जाहीर केली होती. तथापि दिल्लीवरून दटावणी होताच संबंधित नेत्यांच्या भूमिकेत परिवर्तन होऊन त्यांनी काँग्र्रेसच्या उमेदवारांचा प्रचार केला. वेस्टर्न लाइनची पारंपरिक अमराठी मतदार ही एकेकाळी काँग्रेसची व्होट बॅंक होती. परंतु ती व्होट बॅंक आता भाजपाकडे वळली आहे. महापालिका निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांचा दारुण पराभव झालाच, शिवाय विरोधी पक्ष नेते असणारे काँग्रेसमधील मातब्बर प्रस्थ प्रवीण छेडादेखील भाजपाच्या नवख्या उमेदवाराकडून पराभूत झाले. 

मुंबई काँग्रेसमध्ये पूर्वीदेखील देवरा गट-कामत गट कार्यरत होते. दिल्लीश्‍वरांनीही ही गटबाजी मिटविण्यासाठी कधीही गांभीर्याने प्रयत्न न केल्याने मुंबई काँग्रेस संघटनेतही आणि मुंबई महापालिकेतही देवरा-कामत गटात विखुरली गेली. शिवसेनेतून संजय निरुपम काँग्रेसमध्ये आल्यावर त्यांनी आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले. त्यामुळे देवरा गट आणि नव्याने निर्माण झालेला दत्त गट यांचा प्रभाव आजमितीला फारसे मुंबई काँग्रेसमध्ये राहिला नसून कामत गट व निरुपम गटातच मुंबई काँग्रेसमध्ये धुसफुस कायम आहे. 

मुंबई महापालिका निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारून संजय निरुपम यांनी राजीनामा दिला असला तरी त्या राजीनाम्याबाबत पक्षाकडून अद्यापि काहीही निर्णय घेण्यात आलेला नाही. गुरुदास कामत यांची नाराजी नेहमीप्रमाणे मागील महिन्यात पुन्हा एकवार उफाळून आल्याने त्यांनी सर्व पदांचा त्याग केला आहे. त्यांच्याबाबतही पक्षाने अंतिम निर्णय घेतलेला नाही. 

शिवसेना-भाजपातील वादामुळे तिसऱ्या क्रमांकांवर येऊनही काँग्रेसला महापालिकेत विरोधी पक्षनेतेपद मिळाले असले तरी महापालिकेत विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसला गेल्या काही महिन्यात आक्रमकपणे आपला ठसा उमटवता आलेला नाही. शिवसेना-भाजपातील कलगीतुऱ्यामुळेच महापालिकेत काँग्रेस विरोधी पक्षनेतेपद असूनही अडगळीत पडल्यासारखाच आहे. काँग्रेसच्या नगरसेवकांवर मुंबई काँग्र्रेसचा कोणताही अंकुश राहिला नसल्याने काँग्रेसी नगरसेवकांचे सवतेसुभे निर्माण होऊ लागले आहे. दोन दिवसापूर्वी मुंबई काँग्रेसने आयोजित केलेल्या श्रद्धांजली कार्यक्रमाकडेही काँग्रेसच्याच नगरसेवकांनी विशेष स्वारस्य दाखविले नाही.

Web Title: Congress leaders demand to concentrate on Mumbai, reports Sandip Khandge Patil