मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर काँग्रेस आमदार करणार भाजपत प्रवेश

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जुलै 2019

संपूर्ण भारतात काँग्रेसनेते भाजपत प्रवेश करत असताना आता महाराष्ट्रातील काही आमदार मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर भाजपत प्रवेश करणार असल्याचे समजते.  

मुंबई : संपूर्ण भारतात काँग्रेसनेते भाजपत प्रवेश करत असताना आता महाराष्ट्रातील काही आमदार मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर भाजपत प्रवेश करणार असल्याचे समजते.  आघाडीतील नेत्यांचं सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत होत असलेलं आऊटगोईंग हे लोकसभेत काँग्रेस आघाडीच्या झालेल्या पराभवाचं महत्त्वाचं कारण होतं. अशातच आता विधानसभा निवडणुकीतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच पॅटर्नचा अवलंब करण्याची शक्यता आहे. 

राज्य सरकारमधील विद्यमान मंत्री आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसमध्ये राहून भाजपला मदत केली. त्यानंतर निवडणुकीचा निकाल पुन्हा एनडीएच्याच बाजूने लागल्याचं दिसताच विखेंनी भाजपमध्ये उडी घेतली. त्यानंतर विखेंसोबत काँग्रेसमधील इतरही आमदार जातील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र त्यावेळी विखे यांनी एकट्यानेच भाजपमध्ये प्रवेश केला. आता मात्र पुन्हा एकदा विखेंच्या संपर्कात असलेले काँग्रेसमधील नाराज आमदार भाजप प्रवेशाच्या वाटेवर असल्याचं दिसत आहे.

पंढरपूरचे काँग्रेस आमदार भारत भालके यांची गेल्या काही दिवसांपासून भाजपशी जवळीक वाढली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज भारत भालके यांची भेटही घेणार आहेत. ही सदिच्छा भेट आहे, असं सांगितलं जात आहे. मात्र आमदार भालके यांना विखेंच्या माध्यमातून युतीत आणण्याचे काम केले जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. भालके यांच्यासोबत अन्य आमदारांच्या मुख्यमंत्र्यांशी भेटी झाल्यावर त्यांचा भाजपमधला प्रवेश निश्तित करण्यात येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: congress MLA enters in BJP after meet CM devendra Fadnvis