
Satyajeet Tambe : 'हा घ्या पुरावा' काँग्रेसकडून सत्यजीत तांबेंना जशास तसं उत्तर
नाशिकः नाशिक पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सत्यजीत तांबे यांनी काही वेळापूर्पी काँग्रेस पक्ष आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर नाना पटोले यांनी हे आरोप फेटाळून लावले. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी तर पत्रकार परिषदेत पुराव्यानिशी तांबेंना उत्तरं दिली.
नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत ऐनवेळी काँग्रेसचा एबी फॉर्म न जोडता अपक्ष फॉर्म भरल्यामुळे सत्यजित तांबे यांच्यावरून वाद निर्माण झाला. त्यानंतर काँग्रेससोबतची साथ सोडून ते भाजपासोबत जातात की काय, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. काँग्रेसचे नाव न वापरताही सत्यजीत तांबे मोठ्या मताधिक्याने अपक्ष म्हणूनच विजयी झाले. त्यांनी आज त्यांची भूमिका मांडण्यासाठी पत्रकार परिषद घेतली.
एबी फॉर्म चुकीचे दिले- तांबे
सत्यजीत तांबे लढतील की सुधीर तांबे हे ठरलेलं नव्हतं. त्यानंतर मला 9 जानेवारीला एबी फॉर्म द्यावा असं प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं. तर 11 तारखेला फॉर्म मिळाले. एबी फॉर्म चुकीचे देण्यात आल्याचा गौप्यस्फोट सत्यजीत तांबे यांनी केला आहे. हे फॉर्म चुकीचे आल्याचेही त्यांनी पक्षाला कळवले होते. ते म्हणाले जर मला अपक्ष फॉर्म भरायचा असता तर मी प्रदेश कार्यालयाला चुकीचा फॉर्म आल्याचं कळवलं नसतं असं सत्यजित तांबे म्हणाले.
दिलेले एबी फॉर्म योग्यच- काँग्रेस
सत्यजीत तांबे यांच्या दाव्यांना उत्तर देण्यासाठी काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी यावेळी तांबे यांना दिलेले कोरे एबी फॉर्म त्यांनी दाखवले. लोंढे म्हणाले की, सत्यजीत तांबे यांना एबी फॉर्मचे फोटोही पाठवण्यात आले होते. त्यावर ते ओके म्हणालेले. परंतु वडिलांच्या जागेवर मी का लढवू, असं तांबे म्हणाल्याचं लोढेंनी सांगितलं. शिवाय त्यांनी कोणत्याही मुद्द्याचं व्यवस्थित उत्तर दिलं नसल्याचा आरोप लोंढेंनी केला.