कॉंग्रेस-"राष्ट्रवादी' आघाडीचे सूर जुळणार

संजय मिस्कीन
शुक्रवार, 15 जून 2018

जागावाटपाचा 50-50 टक्‍केचा फॉर्म्युला शक्‍य

जागावाटपाचा 50-50 टक्‍केचा फॉर्म्युला शक्‍य
मुंबई - मागील विधानसभेत स्वबळावर आमने-सामने आल्यानंतर दारुण पराभवाचा सामना करावा लागलेल्या कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसने या वेळी आघाडीचे सूर जुळवण्याचा निर्धार केला आहे. दोन्ही पक्षांचे सध्याचे संख्याबळ समान असल्याने आगामी विधानसभा निवडणुकांसाठी 50-50 टक्‍केचा फॉर्म्युला असावा, अशी राष्ट्रवादी कॉंग्रेसची इच्छा असल्याचे समजते.

आगामी विधानसभा निवडणुकांसाठी जागावाटपातील वाद टाळण्यासाठी वाटपाचे हे सूत्र निश्‍चित करणारा प्रस्ताव "राष्ट्रवादी'कडून कॉंग्रेसला देण्यात आल्याची माहिती आहे. समविचारी मित्रपक्षांनाही आघाडीत सामावून घेताना या पक्षांसाठी 26 जागा राखीव ठेवण्याचा मानस "राष्ट्रवादी'ने कॉंग्रेसकडे व्यक्‍त केल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्यातल्या 288 विधानसभा मतदारसंघांपैकी कॉंग्रेसने 131, तर राष्ट्रवादीनेदेखील 131 जागांवर निवडणूक लढवावी आणि इतर मित्रपक्षांसाठी 26 जागा द्याव्यात, यामुळे समविचारी मतांची फाटाफूट होण्याचा धोका टळेल, असे सूत्रांचे मत आहे. सध्या विधानसभेत कॉंग्रेस 45, तर "राष्ट्रवादी'चे 44 आमदार आहेत. लोकसभेत राज्यातून "राष्ट्रवादी'चे चार, तर कॉंग्रेसकडे केवळ दोनच खासदारांचे संख्याबळ आहे. त्यामुळे, दोन्ही पक्षांच्या जागावाटपात परंपरेप्रमाणे अखेरच्या क्षणापर्यंत घोळ राहू नये यासाठी आतापासूनच सूत्र निश्‍चित करण्यावर भर दिला जात आहे.
दरम्यान, दोन्ही पक्षांच्या सूत्रांनुसार जागावाटपाचा प्रस्ताव तयार असला, तरी त्याबाबतची अधिकृत माहिती नसल्याचा दावा केला. पण, "राष्ट्रवादी'चे अध्यक्ष शरद पवार व कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यात याबाबत लवकरच बैठक होऊन अंतिम निर्णय होणार असल्याच्या माहितीला दुजोरा दिला.

Web Title: Congress NCP aghadi vidhansabha election 50-50 formula politics