कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे 40 जागांवर एकमत 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 डिसेंबर 2018

पुणे - आगामी लोकसभा निवडणुकीतील जागावाटपाबाबत कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे 40 जागांवर एकमत झाले आहे. उर्वरित पुण्यासह आठ जागांबाबतचा निर्णय घेण्यासाठी आघाडीच्या नेत्यांची बैठक मुंबईत 18 आणि 19 डिसेंबरला रोजी होणार आहे. यात मित्रपक्षांना कोणत्या जागांचे वाटप करायचे, हे ठरविण्यात येईल, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी येथे शनिवारी दिली. 

पवार म्हणाले, जातिवादी पक्ष सोडून धर्मनिरपेक्ष विचार ज्यांना मान्य आहे, अशा सर्व राजकीय पक्षांना एकत्रित घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. मतांची विभागणी होऊ नये, यासाठी धर्मनिरपेक्ष पक्षांना सोबत घेणार आहोत. नुकत्याच झालेल्या तीन राज्यांच्या निवडणुकीत काट्याची लढत झाली. यात भाजप आणि कॉंग्रेसचे उमेदवार केवळ थोडक्‍या मतांनी निवडून आले. त्यावरून बोध घेतला पाहिजे. 

निवेदिता मानेंनी सबुरीनं घ्यायला हवं होतं 
इचलकरंजी (जि. कोल्हापूर) येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माजी खासदार निवेदिता माने यांना पक्षाने राष्ट्रीय महिला अध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती. त्यांनी पक्ष सोडून शिवसेनेत जाण्यापूर्वी थोडं सबुरीने घ्यायला हवे होते, असे मत पवार यांनी व्यक्‍त केले. 
पवार म्हणाले, आगामी निवडणुकीत समविचारी लोकांना एकत्रित आणण्यासाठी काही निर्णय घेतले जाणार आहेत. इचलकरंजी मतदारसंघात राजू शेट्टी हे विद्यमान खासदार आहेत. शेट्टी यांचे एनडीएसोबत मतभेद जगजाहीर आहेत; परंतु कोणताही निर्णय झालेला नसताना ती जागा शेट्टी यांना जाईल, असे माने यांनी अंदाज बांधला असावा. तसेच, विद्यमान राज्यमंत्री सदाशिव खोत हेसुद्धा या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याच्या प्रयत्नात असल्याचे कानावर आले आहे, अशी गुगलीही पवार यांनी टाकली.

Web Title: Congress-NCP alliance agreed on 40 seats