आघाडी फायद्याचीच; पण सन्मानपूर्वक व्हावी - पृथ्वीराज चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 मार्च 2018

'आघाडी फायद्याची असली, तरी ती होणार का, हा प्रश्‍न महत्त्वाचा आहे. येथे राग-लोभ, मान-पान, जागावाटप कळीचे ठरते. मात्र, भाजपला हरविण्यासाठी कॉंग्रेसला मतांचे विभाजन टाळले पाहिजे.''
- पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री

सातारा - आगामी निवडणुकीत भाजपला हरविण्यासाठी दोन्ही कॉंग्रेसची आघाडी फायद्याची आहे; पण ती सन्मानपूर्वकरित्या व्हायला हवी, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज "सकाळ'शी बोलताना व्यक्त केले.

श्री. चव्हाण म्हणाले, 'भाजप आपल्या ताकदीच्या जोरावर शिवसेनेला सोडणार नाही आणि राष्ट्रवादीला कॉंग्रेससोबत येऊ देणार नाही. कॉंग्रेसच्या मतांची विभागणी भाजपच्या फायद्याची ठरणार आहे. भाजपला हरविणे हे एकच उद्दिष्ट ठेऊन दोन्ही कॉंग्रेसने "ऍडजेस्टमेंट' करायला हवी.''

आगामी निवडणुकीसाठी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्या आघाडीचे संकेत मिळत आहेत. या पार्श्‍वभूमीवर श्री. चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, 'दोन्ही कॉंग्रेसची आघाडी नक्कीच फायद्याची आहे. मुळात एकटे लढलो, तर कॉंग्रेसच्या मतांची विभागणी होऊन त्याचा फायदा भाजपला होणार आहे. मुळात दोन्ही कॉंग्रेसची आघाडी भाजपला परवडणारी नाही. त्यामुळे भाजपचे नेते साम, दाम, दंड, भेद वापरून शिवसेनेला सत्तेतून बाहेर जाऊ देणार नाहीत आणि राष्ट्रवादीला आमच्यात येऊ देणार नाहीत. मुळात आघाडीसाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. त्यांनी बरोबर यावे आणि सन्मानपूर्वक आघाडी करावी. शरद पवार कोणाला किती महत्त्व देतात, यावर सगळे अवलंबून आहे. सन्मानपूर्वक आघाडी झाली पाहिजे, असे आमचे म्हणणे आहे.''

'आघाडी फायद्याची असली, तरी ती होणार का, हा प्रश्‍न महत्त्वाचा आहे. येथे राग-लोभ, मान-पान, जागावाटप कळीचे ठरते. मात्र, भाजपला हरविण्यासाठी कॉंग्रेसला मतांचे विभाजन टाळले पाहिजे.''
- पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री

Web Title: Congress, NCP alliance important says Prithviraj Chavan