Vidhan Sabha 2019 : कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा संयुक्त जाहीरनामा येणार 

सकाळ न्यूज नेटवर्क 
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

आघाडीच्या अधिकृत घोषणेअगोदरच राष्ट्रवादीने आज स्वतंत्रपणे जाहीरनामा घोषित करण्यासाठी पत्रकार परिषद बोलावल्यानंतर ऐनवेळी तो रद्द करण्यात आला.

विधानसभा 2019
मुंबई - आघाडीच्या अधिकृत घोषणेअगोदरच राष्ट्रवादीने आज स्वतंत्रपणे जाहीरनामा घोषित करण्यासाठी पत्रकार परिषद बोलावल्यानंतर ऐनवेळी तो रद्द करण्यात आला. मात्र, यामुळे दोन्ही पक्षांतील समन्वयाबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. 

राष्ट्रवादीचे प्रवक्‍ते नवाब मलिक, जाहीरनामा समितीचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. आमचा जाहीरनामा तयार होता. परंतु, घटकपक्षांनी आग्रह केल्यामुळे एकत्रितपणेच जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे जाहीरनामा जाहीर करण्यात येत नसल्याचे मलिक यांनी स्पष्ट केले. कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे जागावाटप निश्‍चित झाले असून, दोन्ही पक्ष 125-125 जागा लढविणार आहे. दरम्यान, आघाडीत अजून काही पक्ष येणार आहेत. त्यांची जागावाटप लवकरच होईल, असेही मलिक यांनी सांगितले. गृहमंत्री अमित शहा यांनी कलम 370 वरून जनतेची दिशाभूल करण्याचे काम सुरू केले आहे, असेही मलिक यांनी सांगितले. 

भाजपने राष्ट्रवाद शिकवू नये  
भाजपने राष्ट्रवादाच्या मुद्द्यावरच महाराष्ट्राची निवडणूक होणार असल्याचे घोषित केल्याचा दाखला देत मलिक म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवाद शिकवू नये. राष्ट्रवादाच्या नावाखाली अमित शहा धादांत खोटे बोलत असून, 370 कलम रद्द केल्यानंतर पहिल्यांदाच तिरंगा फडकल्याच्या सपशेल थापा मारत ते फिरत असल्याची टीका मलिक यांनी केली. दरम्यान, शरद पवार हे शाहू, फुले, आंबेडकर विचारांचे राजकारण करीत आले आहेत. त्यामुळे शरद पवार हे समतावादी विचारांचे राजकीय नेते आहेत. त्यांचा हा विचार कधीच संपणार नाही. मात्र, भेदभाव व धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या गोळवळकर गुरुजींच्या विचारांचे राजकारण किती काळ टिकेल, हे लवकरच कळेल, अशी टीका मलिक यांनी केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress-NCP alliance will be a joint declaration