कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विधान परिषदेसाठी 'तह'

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 17 जानेवारी 2017

मुंबई - कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीतली वाढती कटुता अखेर विधान परिषदेसाठी होणाऱ्या पाच जागांच्या निवडणुकीत निवळली आहे.

मुंबई - कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीतली वाढती कटुता अखेर विधान परिषदेसाठी होणाऱ्या पाच जागांच्या निवडणुकीत निवळली आहे.

परस्परांवर कुरघोडीचे राजकारण करताना नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात सर्वाधिक फटका बसल्याने या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसने आघाडीचा "तह' करण्यास पसंती दिली. कॉंग्रेसनेही या सामंजस्याच्या आघाडीला प्रतिसाद देत औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विक्रम काळे यांना पाठिंबा जाहीर केला, तर कोकण शिक्षक मतदारसंघ शेतकरी कामगार पक्षाला देण्यावर कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे एकमत झाले. या मतदारसंघात शेकापचे बाळाराम पाटील हे उमेदवार राहणार आहेत.

नाशिक-नगर पदवीधर मतदारसंघात मात्र या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसने युवा उमेदवार संग्राम कोते-पाटील यांना कॉंग्रेसचे विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या विरोधात मैदानात उतरवण्याची तयारी केली होती.

राष्ट्रवादी कॉंग्रेसने पहिल्यांदाच विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेला उमेदवार मैदानात उतरवण्याचे संकेत देत युवकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आघाडी झाल्याने या मतदारसंघात भाचे-मेव्हणे अशी लढत टळली आहे. डॉ. सुधीर तांबे हे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे जवळचे नातेवाईक आहेत, तर संग्राम कोते पाटीलही थोरात यांचे निकटचे नातेवाईक आहेत. तांबे व कोते पाटील यांच्यात भाचे-मेव्हणे असे नातेसंबंध असल्याने ही निवडणूक सगेसोयऱ्यांतच होण्याचे संकेत होते. या मतदारसंघात डॉ. तांबे यांचे वर्चस्व असले, तरी कोते पाटील यांनी 40 हजार पदवीधर मतदारांची नोंदणी करत आव्हान उभे केल्याचे मानले जात होते. आघाडीतल्या या संघर्षाचा लाभ भाजप-शिवसेनेला होण्याची शक्‍यता असल्याने आघाडीच्या निर्णयाने कॉंग्रेसचे पारडे जड मानले जात आहे. औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान आमदार विक्रम काळे यांना आघाडीचा फायदा होण्याची चिन्हे आहेत.

नागपूर शिक्षक मतदारसंघात कॉंग्रेसला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पाठिंबा मिळाल्याने आता या पाचही विधान परिषद जागांसाठी भाजप विरुद्ध कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस-शेकाप असा चुरशीचा सामना रंगणार आहे. दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी आघाडीचा निर्णय घेतल्याने स्थानिक कार्यकर्ते व उमेदवारांनी मात्र सुटकेचा निःश्‍वास सोडला आहे.

Web Title: congress-ncp congress vidhan parisha election