कॉंग्रेस- राष्ट्रवादीत भ्रष्टाचार, अनागोंदी - फडणवीस

कॉंग्रेस- राष्ट्रवादीत भ्रष्टाचार, अनागोंदी - फडणवीस

कऱ्हाड - आम्ही सहकार मोडायला निघालो आहोत, असा आरोप आमच्यावर कॉंग्रेस- राष्ट्रवादीकडून केला जात आहे. खरे तर त्यांनीच मोडीत काढलेल्या सहकाराचे आम्ही शुद्धीकरण करत आहोत. सहकाराचा स्वाहाकार आम्ही होऊ देणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिला. कॉंग्रेस- राष्ट्रवादीच्या भ्रष्ट, अनागोंदी कारभारात जीव गुदमरलेली चांगली माणसेच आमच्या पक्षात येत आहेत, असे सांगत त्यांनी दोन्ही कॉंग्रेसवर सडकून टीका केली. 

भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुंढे- गोटे (ता. कऱ्हाड) येथे झालेल्या सभेत मुख्यमंत्री बोलत होते. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, मदनराव मोहिते, डॉ. सुरेश भोसले, प्रदेश चिटणीस अतुल भोसले, नीता केळकर, नगराध्यक्ष रोहिणी शिंदे, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, डॉ. दिलीप येळगावकर, भरत पाटील, दीपक पवार, अनिल देसाई आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, ""अनेक वर्षे पश्‍चिम महाराष्ट्र कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर राहिला. त्या पक्षांची हुकूमशाही, अनागोंदी, भ्रष्टाचार चालला आहे. त्यामध्ये चांगल्या माणसांचा जीव गुदमरतोय. त्यामुळे ती चांगली माणसे, भाजपमध्ये येत आहेत. दोन वर्षांपूर्वी मतदारांनी आम्हाला निवडून दिले. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिलो. सरकार योग्य दिशेने, प्रामाणिकपणे चालले आहे. त्यामुळे पालिकांच्या निवडणुकीत सर्वात जास्त मोठा पक्ष भाजप झाला. दुष्काळात शेतकऱ्यांना आठ हजार कोटींची मदत केली. साखरेचे भाव पडल्यावर कारखान्यांना दोन हजार कोटींचे पॅकेज दिले. देशात अन्य राज्यांच्या तुलनेत 98 टक्के एफआरपी आम्ही दिली. त्यासाठी कारखान्यांना कर्ज उपलब्ध करून दिले. येत्या तीन वर्षांत उसाची शेती ठिबकखाली आणली जाईल. शेतीमध्ये गुंतवणूक होण्यासाठी गटशेतीला प्राधान्य दिले जाईल.'' 

महसूलमंत्री पाटील म्हणाले, ""पश्‍चिम महाराष्ट्र ही कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसला आपली मक्तेदारी वाटली. मात्र, आता परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. ही ब्राह्मणांची संघटना आहे, असा आरोप शरद पवार आमच्यावर करायचे. 1978 ला वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसून मुख्यमंत्री होताना याच पक्षाची मदत तुम्हाला लागली. त्या वेळी आम्ही जातिवादी नव्हतो. आता आम्ही जातिवादी कसे झालो? भाजप जातिवादी पक्ष असून, तो मराठा आरक्षण देणार नाही, अशी गरळ नारायण राणे ओकतात. याच राणेंना मुख्यमंत्री होताना आमची मदत लागली होती. आता मतदार जागृत झाले आहेत. बाजार समित्यांवरील मक्‍तेदारी आम्ही संपुष्टात आणली. सातारा जिल्ह्यात उमेदवार मिळणे अवघड होते. आता पृथ्वीराज बाबांना उमेदवार मिळाले नाहीत म्हणून त्यांनी राष्ट्रवादीशी आघाडी केली. त्यांनी आता आम्हाला शिकवू नये. सातारा जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर भाजपचाच झेंडा फडकवा.'' 

राहुल, पवारांच्या बॅंका दिवाळखोर 
मुख्यमंत्री म्हणाले, ""मतदान बॅंकेत ठेवलेल्या डिपॉझिटसारखे आहे. विकासाच्या रूपाने व्याजासहित डिपॉझिट परत मिळेल, अशी अपेक्षा मतदार करतात. मतदानाचे डिपॉझिट कोणत्या बॅंकेला दिले पाहिजे, ती ठरविण्याची वेळ आली आहे. तुमचे मतांचे डिपॉझिट आमच्या बॅंकेत ठेवले, तर पाच वर्षांत पाचपट विकास करून व्याजासह डिपॉझिट आम्ही परत देऊ. दुसरी बॅंक राहुल बाबा व पृथ्वीराज बाबांची आणि तिसरी शरद पवार आणि अजित पवारांची आहे. त्या बॅंकांची दिवाळखोरी निघाली आहे. तेथे मतांचे डिपॉझिट ठेवाल, तर व्याज सोडाच; डिपॉझिटही मिळणार नाही.'' 

कारखाने विकणाऱ्यांवर निवडणुकीनंतर कारवाई 

ज्यांनी ऊस मुळापासून खाल्ला, बॅंका, संस्था बुडवल्या, त्यांची आता गय केली जाणार नाही. त्यांचा भ्रष्टाचार मुळापासून उखडण्यासाठी भाजपला विजयी करा, असे आवाहन करून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ""अनेकांनी साखर कारखाने मातीमोल किमतीला विकले, विकत घेतले. 23 तारखेला आचारसंहिता संपू द्या. राज्यातील 35 कारखान्यांना आम्ही जमीन दिली होती. तुम्ही परस्पर कारखाने विकले असल्याने तुम्हाला करोडो रुपयांचा दंड आम्ही ठोठावणार आहोत. आता आम्ही स्वस्थ बसणार नाही.'' 

मदनदादांच्या गळ्यात भाजपचा स्कार्प 
कृष्णाकाठचे ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते यांनी आज थेट मुख्यमंत्र्यांच्या सभेला उपस्थिती लावली. त्यामुळे उपस्थितांत त्याचीच चर्चा होती. मदनदादांनी मुख्यमंत्र्यांचा बुके देऊन सत्कार केला. त्यानंतर भाजपचा मफलर घालून मुख्यमंत्र्यांनी मदनदादांचे स्वागत केले. त्या वेळी उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. 

मुख्यमंत्री म्हणाले... 

- पहिल्या टप्प्यात चार हजार गावे दुष्काळमुक्त 
- नवीन वर्षात 11 हजार गावांचे लक्ष्य 
- शेतकऱ्यांना अखंडित वीज देणार 
- 2019 पर्यंत गरिबांना मिळणार घरे 
- शिक्षण क्षेत्राचा दर्जा दोन वर्षांत वाढला 
- राज्यात पहिल्या क्रमांकांची गुंतवणूक 
- कौशल्य विकासाच्या माध्यमातून तरुणांना काम देणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com