कॉंग्रेस- "राष्ट्रवादी'त आघाडीवरून जुंपली

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 28 जानेवारी 2017

मुंबई - शिवसेना-भाजप युतीची मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काडीमोड झालेली असताना कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आघाडीची शक्‍यता असल्याचे दिसत होते. मात्र या दोन्ही पक्षांच्या मुंबई अध्यक्षामध्ये शुक्रवारी राजकीय टोलेबाजी रंगल्याने आघाडीची शक्‍यताच नसल्याचे स्पष्ट झाले.

राष्ट्रवादीने उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्याने कॉंग्रेसने आघाडीची शक्‍यता मावळल्याचे मागील आठवड्यात जाहीर केले होते. मात्र त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा प्रस्ताव आला तर त्यावर विचार करू, असा सूर मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष संजय निरूपम यांनी लावला होता. आज मात्र निरूपम यांनी "राष्ट्रवादी'वर थेट हल्लाबोल करत भाजपसोबत त्यांची छुपी युती असल्याची टीका केली. विधानसभा निवडणुकीत भाजपने युती तोडल्यानंतर "राष्ट्रवादी'नेही आघाडी तोडण्याची घोषणा केली होती. त्याचा संदर्भ देत निरुपम म्हणाले, की आता मुंबई महापालिकेत शिवसेनेने युती तोडल्यानंतर "राष्ट्रवादी'ला कॉंग्रेससोबत आघाडी करायची इच्छा झाली असेल असे वाटत नाही. "राष्ट्रवादी'ला त्यांचा छुपा मित्रपक्षासोबत युती करायची आहे. असा टोला त्यांनी लगावला.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी कॉंग्रेस सोबत आघाडी करण्यास "राष्ट्रवादी'ची बिलकुल इच्छा नसल्याचे जाहीर केले. संजय निरुपम यांनी स्वत:च्या पक्षात काय सुरू आहे याचा अभ्यास करावा. त्यांच्या विरोधात स्वपक्षातले नेते बंड करून उठलेले असताना त्याकडे अधिक लक्ष द्यावे. राष्ट्रवादी कॉंग्रेस विचारांची बांधिलकी जोपासणारा पक्ष असून, मुंबई स्वबळावर निवडणुका लढण्यास सज्ज असल्याचे अहिर यांनी स्पष्ट केले.

Web Title: congress-ncp politics