काँग्रेस-राष्ट्रवादीचं घोडं चार जागांवर अडलं..!

काँग्रेस-राष्ट्रवादीचं घोडं चार जागांवर अडलं..!

मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत जागावाटपासाठी चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असले तरी चाळीस लोकसभा मतदारसंघांचे सूत्र निश्‍चीत झाल्याची माहिती आहे. तर, चार लोकसभा जागा आघाडीत सहभागी होणाऱ्या घटक पक्षांसाठी वगळून इतर चार लोकसभा मतदारसंघ वाटपावर घोडे अडल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी स्पष्ट केले. 

काँग्रेसने राष्ट्रवादीसोबत आघाडीचा निर्णय पक्‍का केला आहे. दिल्लीत राहुल गांधी व शरद पवार यांच्यात आघाडीच्या निर्णयावर शिक्‍कामोर्तब झाले आहे. ज्या पक्षाकडे जिंकून येण्याची ताकद असलेला उमेदवार असेल, त्या पक्षासाठी मतदारसंघ सोडण्यावर दोन्ही पक्षांत एकमतदेखील झाले आहे. मात्र, राष्ट्रवादीने काँग्रेसकडील लोकसभा मतदारसंघावर सक्षम उमेदवाराचा निकष लावत दावा केला आहे. तर, काँग्रेसनेदेखील राष्ट्रवादीकडील एका मतदारसंघावर दावा केला आहे. यामध्ये औरंगाबाद, अहमदनगर, पुणे व यवतमाळ या चार लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे.

औरंगाबाद, यवतमाळ व पुणे हे तीन लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे आहेत. मात्र, तिथे काँग्रेसकडे सक्षम उमेदवार नाही. त्यामुळे, राष्ट्रवादीने हे मतदारसंघ सोडण्याची मागणी केली आहे, तर अहमदनगर हा राष्ट्रवादीकडे आहे, त्यावर काँग्रेसने दावा केला आहे. 

पालघर लोकसभा बहुजन विकास आघाडीसाठी सोडण्याची दोन्ही पक्षांची तयारी आहे. त्यासोबतच अकोला, अमरावती व हातकणंगलेदेखील आघाडीत सहभागी होणाऱ्या सहयोगी पक्षांसाठी देण्यावर दोन्ही पक्षांचे एकमत आहे. यामध्ये अकोला प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी, तर हातकणंगले राजू शेट्टी यांच्यासाठी देण्याचे सूतोवाच आहे. पण, प्रकाश आंबेडकर राष्ट्रवादीसोबत असल्याने काँग्रेसला समर्थन देण्याची शक्‍यता नाही. अशा स्थितीत ऐनवेळी हा निर्णय झाल्यास अकोला प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी सोडला जाईल, असे मानले जात आहे. 

लोकसभा लढण्यास नेत्यांचा नकार .. 
लोकसभा निवडणूक लढण्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या बहुतांश बड्या नेत्यांचा नकार असल्याचे समजते. विधानसभा निवडणूकच बरी अशी त्यांची भूमिका असल्याने नव्या सक्षम उमेदवारांच्या नावावर पक्षात खल सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com