शिवसेना-कॉंग्रेस कदापि एकत्र येणार नाही - पृथ्वीराज चव्हाण

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 12 फेब्रुवारी 2017

कॉंग्रेसने मुंबईच्या विकासाची भूमिका मांडली आहे. शिवसेना-भाजपचे भांडण हे सत्तेसाठी सुरू असलेली साठमारी आहे, हे जनतेला कळून चुकले आहे. त्यामुळे जनता कॉंग्रेसलाच निवडून देईल, असा दावा चव्हाण यांनी केला. 

मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीनंतर शिवसेना आणि कॉंग्रेस अजिबात एकत्र येण्याची शक्‍यता नसून, तसा अपप्रचार केला जात असल्याची टीका माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. 

मुंबईच्या अधोगतीला शिवसेना जबाबदार असल्याचा आरोपही गांधीभवन येथे पत्रकार परिषदेत चव्हाण यांनी केला. ""शिवसेना आता संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारचे गोडवे गात आहे; पण "यूपीए' सरकारने केलेली कामे जनतेच्या समोर आहेत. आम्हाला शिवसेनेच्या प्रमाणपत्राची गरज नाही. या निवडणुकीनंतर शिवसेना आणि कॉंग्रेस एकत्र येतील, असा अपप्रचार केला जात आहे. कॉंग्रेस पक्ष शिवसेनेसारख्या ना महापालिकेत, ना राज्यात जातीयवादी पक्षासोबत कदापि जाणार नाही,'' असे चव्हाण म्हणाले. 

ते म्हणाले, ""शिवसेना-भाजप हे दोन्ही पक्ष महापालिकेत एकत्र सत्तेत होते. त्यांनी 2012 मध्ये एकत्रित जाहीरनामा प्रकाशित केला होता. या जाहीरनाम्यातील अनेक आश्‍वासने अद्यापही पूर्ण केली नाहीत. मराठी भाषाभवन, मराठी रंगभूमीभवन बांधण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले होते; पण ते पूर्ण केले नाही. शिवसेना मराठी माणसाच्या नावाने राजकारण करते; पण मराठी माणसाच्या विकासासाठी काहीच करत नाही. शिवसेनेच्या गेल्या पाच वर्षांच्या काळात मुंबईतील 37 मराठी शाळा बंद झाल्या आहेत आणि 40 हजार मराठी मुलांनी शाळा सोडली. रस्ते गैरव्यवहार, डंपिंग, पेंग्विन, टॅब, तसेच नालेसफाई गैरव्यवहार याशिवाय शिवसेना-भाजपने काही केले नाही. त्यामुळे हे दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप करून लोकांचे लक्ष विकासाच्या प्रश्‍नावरून दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न करत आहेत.''

कॉंग्रेसने मुंबईच्या विकासाची भूमिका मांडली आहे. शिवसेना-भाजपचे भांडण हे सत्तेसाठी सुरू असलेली साठमारी आहे, हे जनतेला कळून चुकले आहे. त्यामुळे जनता कॉंग्रेसलाच निवडून देईल, असा दावा चव्हाण यांनी केला. 

Web Title: congress not alliance with shiv sena says Prithviraj Chavan