कॉंग्रेस अहवाल सांगतोय, मुंबई आपलीच! 

मृणालिनी नानिवडेकर
गुरुवार, 3 जानेवारी 2019

मुंबई - 'मोदीत्वापासून देश दूर जावू लागला असून, लोकसभेच्या मुंबईतील तीन-चार जागांवर उमेदवार हमखास निवडून येणार,' असे सांगणाऱ्या अंतर्गत अहवालामुळे कॉंग्रेसमध्ये चैतन्य पसरले आहे. अशातच सर्वांना एकत्रित ठेवण्यासाठी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पुढाकार घ्यावा, असे ठरविण्यात आले आहे. तसेच, गटबाजीचे गालबोट उत्साहाच्या वातावरणाला लागू नये, यासाठी एक जानेवारीला बैठक होणार होती; मात्र प्रदेशाध्यक्ष चव्हाण दिल्लीत असल्यामुळे ती पुढे ढकलण्यात आली आहे. 

मुंबई - 'मोदीत्वापासून देश दूर जावू लागला असून, लोकसभेच्या मुंबईतील तीन-चार जागांवर उमेदवार हमखास निवडून येणार,' असे सांगणाऱ्या अंतर्गत अहवालामुळे कॉंग्रेसमध्ये चैतन्य पसरले आहे. अशातच सर्वांना एकत्रित ठेवण्यासाठी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पुढाकार घ्यावा, असे ठरविण्यात आले आहे. तसेच, गटबाजीचे गालबोट उत्साहाच्या वातावरणाला लागू नये, यासाठी एक जानेवारीला बैठक होणार होती; मात्र प्रदेशाध्यक्ष चव्हाण दिल्लीत असल्यामुळे ती पुढे ढकलण्यात आली आहे. 

कॉंग्रेसमधील उत्साही वातावरण कायम राहावे, यासाठी आम्ही कोणताही धोका पत्कारणार नाही, असे एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने "सकाळ'ला सांगितले. दक्षिण मुंबई, दक्षिण-मध्य मुंबई, उत्तर-पश्‍चिम मुंबई आणि उत्तर-मध्य मुंबई या जागा कॉंग्रेसच्या अंतर्गत सर्वेक्षण अहवालात "ए-प्लस' दाखविण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील सर्व मतदारसंघांची प्राथमिक बैठक पार पडली आहे. "सोन्याची अंडी' देणाऱ्या मुंबईत अंतर्गत वादामुळे पक्षाचे नुकसान नको, याकरिता कॉंग्रेसकडून सावध पावले टाकली जात आहेत. वातावरणनिर्मितीसाठी एक जानेवारीलाच बैठक होणार होती; मात्र ती पुढे ढकलण्यात आली. प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांना पक्षाच्या "व्हिप'नुसार संसद अधिवेशनाला हजेरी लावायची असल्याने ही बैठक पुढे ढकलण्यात आली. लवकरच ही बैठक घेतली जाईल, असे निरूपम यांनी सांगितले. 

उत्तर-पश्‍चिम -
गुरुदास कामत यांच्या निधनामुळे हा मतदारसंघ कॉंग्रेससाठी रिक्‍त आहे. येथून मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम, माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंह इच्छुक असल्याचे बोलले जाते. कामत यांच्या पत्नी महारूख यांनी रिंगणात उतरावे, अशीही कार्यकर्त्यांची इच्छा आहे. शिवसेनेचे गजानन कीर्तिकर या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. 

उत्तर मुंबई -
हा मतदारसंघ एकेकाळी निरूपम यांनी पिंजून काढला होता; मात्र गुजराती मतदारांमुळे भाजपचे सध्याचे खासदार गोपाळ शेट्टी यांचे कडवे आव्हान लक्षात घेत निरूपम यांचे शेजारच्या मतदारसंघावरही लक्ष असले, तरी अध्यक्षांनीच जुना मतदारसंघ टाळणे योग्य नसल्याचे बोलले जाते. 2009 मध्ये कृपाशंकर सिंह येथून लढण्यास इच्छुक होते; मात्र त्या वेळी पक्षाच्या आदेशामुळे त्यांना लढता आले नाही. आता मात्र त्यांनी या जागेवर दावा केला आहे. संधी न मिळाल्यास ते भाजपची वाट धरतील, असेही बोलले जाते. कारण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे घनिष्ट संबंध आहेत. 

दक्षिण मध्य -
या मतदारसंघात एकनाथ गायकवाड यांना पुन्हा यश मिळेल, अशी कॉंग्रेसला आशा आहे. त्यांची कन्या व आमदार वर्षा गायकवाड यांनाही संधी मिळू शकते; मात्र शिवसेनेचे राहुल शेवाळे यांना येथे हरवणे फार सोपे नसल्याचेही बोलले जाते. 

दक्षिण मुंबई -
मिलिंद देवरा यांना दक्षिणेचे पुन्हा वेध लागले आहेत. त्यामुळे त्यांनी येथे जनसंपर्क सुरू केला आहे. शिवसेना-भाजप वेगळे लढल्यास शिसेनेकडून खासदार अरविंद सावंत आणि भाजपकडून मंगलप्रभात लोढा अशी लढत होऊ शकते. त्याचा फायदा देवरा यांना होईल, असा कॉंग्रेसला विश्‍वास आहे. 

उत्तर-मध्य -
कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या या मतदारसंघात प्रिया दत्त यांना प्रचंड विरोध आहे. चार वर्षांत कुठेही सक्रिय नसलेल्या दत्त यांना ही जागा परंपरागत जहॉंगिरी वाटते काय, असा प्रश्‍न केला जातो आहे. नसीम खान, कृपाशंकर यांचा दत्त यांच्या नेतृत्वास यापूर्वीही विरोध होता. तेथे नगमा यांना संधी मिळावी, असे प्रयत्न आहेत. 

उत्तर-पूर्व -
किरीट सोमय्या यांनी खासदार असलेल्या या मतदारसंघात राष्ट्रवादीचे संजय दिना पाटील यांनी "मी येतोय...' असे फलक लावले आहेत; पण त्यावर पक्षाचे चिन्ह नाही. या जागेवर पक्षप्रवक्‍ते नवाब मलिक यांनाही संधी मिळण्याची शक्‍यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress Report Mumbai Aaplich Politics