Lok Sabha Election : काँग्रेसचाही आजपासून मतदारसंघांचा आढावा; ४८ मतदारसंघांची करणार चाचपणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Congress review 48 constituencies from today lok sabha election politics

Lok Sabha Election : काँग्रेसचाही आजपासून मतदारसंघांचा आढावा; ४८ मतदारसंघांची करणार चाचपणी

मुंबई : हिमाचल प्रदेश आणि कर्नाटक विधानसभा निवडणुकीत एकहाती विजयाने आत्मविश्वास वाढलेल्या प्रदेश काँग्रेसने राज्यातील सर्व ४८ लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्याची रणनीती आखली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने २०१९ मध्ये लढविलेल्या २३ लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला असला तरी काँग्रेस मात्र बारामतीसह सर्वच जागांचा आढावा घेणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने टिळक भवन या पक्ष कार्यालयात २ व ३ जून रोजी बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत राज्यातील लोकसभा मतदारांचा आढावा घेतला जाणार आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत असून बैठकीला राज्यातील प्रमुख नेते व सर्व जिल्हाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत.

उद्यापासून ( ता.२ ) बैठकीला सुरुवात होत असून पहिल्या दिवशी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, धुळे, नंदुरबार, जळगाव, रावेर, नगर, शिर्डी, नाशिक, दिंडोरी, लातूर, बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशीम, गडचिरोली, चिमूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, नागपूर, रामटेक व पालघर या मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे.

या बैठकीला विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष आरिफ नसीम खान, आदींचीही उपस्थिती असेल. त्याचप्रमाणे, महाविकास आघाडी सरकार मधील काँग्रेसचे माजी मंत्री, विधानपरिषद गटनेते सतेज पाटील तसेच प्रदेश निवडणूक समन्वय समितीचे सदस्य उपस्थित असतील.

शनिवार, ३ जून रोजी पुणे, सांगली, कोल्हापूर, हातकणंगले, सातारा, सोलापूर, माढा, बारामती, शिरूर, मावळ, रायगड, नांदेड, हिंगोली, औरंगाबाद, जालना, परभणी, उस्मानाबाद, बीड, ठाणे, भिवंडी व कल्याण या मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे.

टॅग्स :CongressLok Sabha