नितीन गडकरींना हरवणार कोण? विरोधकांची डोकेदुखी!

राजेश चरपे
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

नितीन गडकरींचे अधिक, उणे
केंद्रीय मंत्री म्हणून साडेचार वर्षांत कामाचा झंझावात
मुख्यमंत्री, सहा आमदार, महापालिका या जमेच्या बाजू
नोटाबंदी, जीएसटी, सामाजिक ताणतणावाने असलेली नाराजी
मुस्लिम, अनुसूचित जाती, हलबा समाजातील अविश्‍वासाचे वातावरण, ओबीसी समाजातील काहीशी नाराजी

काँग्रेसकडून नागपूर हिसकावून घेतल्यानंतर तो भाजपचा बालेकिल्ला झाला. नितीन गडकरींसह मुख्यमंत्र्यांनी मोठे कार्य उभे केले हीच जमेची बाजू आहे. मात्र, सामाजिक नाराजी दूर करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. काँग्रेसला गटबाजीचे ग्रहण आहे.

भाजपचे ‘हेवी वेट’ नेते केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात नागपूरमधून कोणाला लढवायचे, असा मोठा प्रश्‍न सध्या काँग्रेसला भेडसावत आहे. गटबाजीने ग्रासलेल्या काँग्रेसमध्ये विजयापेक्षा फक्त आपल्या गटाला उमेदवारी मिळावी आणि पक्षावर आपलेच नियंत्रण राहावे, यासाठी काँग्रेसमध्ये संघर्ष आहे. त्याने गडकरींना दिलासा मिळत आहे. 

नागपूर एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. भाजपने राममंदिरासाठी सुरू केलेल्या कारसेवेने राजकीय चित्र बदलले. काँग्रेस सोडून भाजपत दाखल झालेल्या बनवारीलाल पुरोहित यांनी १९९६ मधील निवडणुकीत सर्वप्रथम भाजपला विजय मिळवून दिला. मात्र, त्यांनी लवकरच भाजपला सोडचिठ्ठी दिली. पुन्हा काँग्रेसने नागपूर ताब्यात घेतले. १९९८ ते २००९ पर्यंत सलग चारवेळा विलास मुत्तेमवार यांनी भाजपला पराभवाची धूळ चारली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर गडकरींनी लोकसभा लढण्याची घोषणा करीत शहराच्या आंतरमशागतीला सुरवात केली. 

महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना केलेल्या विकासकामांमुळे गडकरींचे नाव तसेही घराघरांत पोचले होते. मुत्तेमवा- गडकरी तुलना होऊ लागली. त्या बळावर २०१४ मध्ये गडकरी तब्बल दोन लाख ८४ हजारांच्या मताधिक्‍याने निवडून आले. पराभवाच्या जबर धक्‍क्‍याने काँग्रेस खचली, पार भूईसपाट झाली.

मुत्तेमवारांविरोधात अर्धी काँग्रेस उघडपणे समोर आली आहे. गडकरींविरोधात नव्या दमाच्या उमेदवाराची मागणी होत आहे. याकरिता ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल गुडधे यांचे नाव रेटले जाते. गुडधे अभ्यासू असले तरी त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची फौज नाही. आपल्याला उमेदवारी द्यायची नसल्यास शहराध्यक्ष विकास ठाकरे किंवा बबनराव तायवाडे यांना उमेदवारी देण्याचा मुत्तेमवारांचा आग्रह आहे. एकुणात काँग्रेसने कोणालाही उमेदवारी दिली तरी एकमत होणार नाही, असे चित्र आहे. काँग्रेसमधील ही सुंदोपसुंदी गडकरींना मदतकारक ठरेल, असे सध्याचे चित्र आहे.  

२०१४ चे मतविभाजन
नितीन गडकरी (भाजप):     ५,८७,७६७ (विजयी)
विलास मुत्तेमवार (काँग्रेस):     ३,०२,९१९
मोहन गायकवाड (बसप) :    ९६,४३३
अंजली दमानिया (आप):    ६९,०८१

नितीन गडकरींचे अधिक, उणे
केंद्रीय मंत्री म्हणून साडेचार वर्षांत कामाचा झंझावात
मुख्यमंत्री, सहा आमदार, महापालिका या जमेच्या बाजू
नोटाबंदी, जीएसटी, सामाजिक ताणतणावाने असलेली नाराजी
मुस्लिम, अनुसूचित जाती, हलबा समाजातील अविश्‍वासाचे वातावरण, ओबीसी समाजातील काहीशी नाराजी

Web Title: Congress searching for strong candidate against Nitin Gadkari in Lok Sabha 2019