कॉंग्रेसची "सेवाग्राम' चाणक्‍यनीती

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 4 ऑक्टोबर 2018

मुंबई - कॉंग्रेसने पारंपरिक दरबारी बैठकांना बगल देत 76 वर्षांनंतर पक्षाचे बलस्थान महात्मा गांधी यांची कर्मभूमी सेवाग्राममधे राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक घेतली. पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार पटेलांच्या राष्ट्रीय कॉंग्रेसनंतर पहिल्यांदाच कॉंग्रेसची कार्यकारिणी झाल्याने राजकारणात याचे पडसाद उमटले आहेतच; पण त्याहून अधिक कॉंग्रेस पक्षांतर्गत या बैठकीनंतर नवसंजीवनी मंत्र मिळाल्याची भावना जागी झाल्याचे चित्र आहे. राहुल गांधी यांची कॉंग्रेस आक्रमक असल्याचे वारंवार स्पष्ट होत असताना नव्या चाणक्‍यनीतीतदेखील आता ही कॉंग्रेस अग्रभागी राहत असल्याचे या बैठकीचे वैशिष्ट्य मानले जात आहे. सेवाग्राममधे अशी बैठक व्हावी, ही भूमिका कॉंग्रेसचे जेष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी राहुल गांधी यांच्यासमोर मांडली. अशोक गेहलोत हे राहुल गांधी यांचे राजकीय मार्गदर्शक म्हणून यशस्वी होताना दिसत आहेत. गुजरात निवडणुकांत त्यांनी प्रभारी म्हणून पार पाडलेल्या कामगिरीनंतर तर ते अधिकच विश्‍वासार्ह नेते झाले आहेत. भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ध्रुवीकरणाच्या विचारधारेशी असलेल्या संघर्षाला पुन्हा एकदा टोक यावं यासाठी सेवाग्राम बैठकीचं आयोजन करण्यात आल्याचे बोलले जात आहे. राहुल गांधी यामध्ये काही प्रमाणात यशस्वी झाल्याचे नाकारता येत नाही. महात्मा गांधीची 150 वी जयंती सरकारी कार्यक्रम बनून राहणार नाही, याची वेळीच काळजी घेत कॉंग्रेसनं पुन्हा एकदा बाजी मारल्याचं जाणकारांना वाटते.
महात्मा की राह पर

अनियोजित व रटाळवाण्या परंपरेला छेद देत राहुल गांधीच्या कॉंग्रेसनं "महात्मा की राह पर' हे घोषवाक्‍य घेत देशातल्या युवा वर्गाला गांधी विरुद्ध गोडसे या संघर्षाच्या इतिहासाची उजळणी करण्यासाठी प्रवृत्त करण्याची ही एक प्रकारची खेळीच होती. या खेळीत तूर्तास तरी कॉंग्रेसने बाजी मारत महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीचा केवळ इव्हेंन्ट न करता विचारांच्या संघर्षाची यशस्वी सुरवात केल्याचं मानले जात आहे.

Web Title: Congress Sevagram Politics